भुसावळ शहरात 8 डिसेंबरपासून बहिणाबाई महोत्सव

0

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ; समारोपाला मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांची राहणार उपस्थिती

भुसावळ- खान्देशच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या सन्मानार्थ व महिला बचत गटाच्या आर्थिक विकासासाठी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर (डी.एस.ग्राऊंड) 8 ते 12 डिसेंबरदरम्यान बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, महानंदाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांची उपस्थिती राहणार आहे.

पहिल्या दिवशी होणार सांस्कृतिक कार्यक्रम
महोत्सवाचा शुभारंभ शनिवार, 8 रोजी दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खासदार ए.टी.पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, विधान परीषद सदस्य स्मिता वाघ, विधान परीषद सदस्य चंदूलाल पटेल, जिल्हा परीषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बुलढाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, विधान परीषदेचे माजी सदस्य डॉ.गुरूमुख जगवानी, बेटी बचाओ बेटी पढोओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, बुलढाण्याच्या महिला बालकल्याण सभापती श्‍वेता महाले, जि.प.शिक्षण समिती सभापती पोपट भोळे, निखील खडसे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शारदा खडसे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी पाच वाजता निवडक कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.

9 रोजी मार्गदर्शन शिबिर, फॅन्सी ड्रेस स्पर्धा
रविवार, 9 रोजी दुपारी दोन वाजता बचत गट महिला मार्गदर्शन शिबिर होईल. कृषिभूषण सीताबाई मोहिते (जालना), यती राऊत (पालघर) मार्गदर्शन करतील. कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजता तीन वयोगटात फॅन्सी ड्रेस स्पर्धा होईल तर सायंकाळी सात वाजता कान्हदेशची लोकधारा हे महानाट्य सादर करण्यात येईल.

10 रोजी मॅजिक शो, कवितांची सुरेल मैफल
सोमवार, 10 रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपा महिला मोर्चाच्या माधवी नाईक यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता प्रा.यजुर्वेंद महाजन यांचे ‘उत्तुंग भरारी घेऊया’ या विषयावर व्याख्यान होईल तर पाच वाजता शेती व मातीशी नातं सांगणार्‍या बहिणाबाईंच्या गीतांसह कवितांची सुरेल मैफल ‘अरे संसार संसार’ रंगणार आहे शिवाय रात्री सात वाजता एन.सी.सरकार (नागपूर) यांचा ‘मॅजिक शो’ तर रात्री आठ वाजता शहरातील स्थानिक कलावंतांना विविध कलाविष्कार सादर करण्यास संधी देण्यात येणार आहे.

11 रोजी संवाद लोकांशी, होम मिनिस्टर कार्यक्रम
मंगळवार, 11 रोजी दुपारी तीन वाजता डॉ.प्रभाकर जोशी (अमळनेर) यांचे ज्येष्ठ नागरीकांसाठी मार्गदर्शन तसेच सायंकाळी पाच वाजता ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर गणेश शिंदे यांचे व्याख्यान तसेच सायंकाळी सहा वाजता होम मिनीस्टर कार्यक्रम सचिन सावंत (पुणे) सादर करतील तसेच रात्री आठ वाजता शहरातील स्थानिक कलावंतांना विविध कलाविष्कार सादर करण्यास संधी देण्यात येणार आहे.

12 रोजी समारोपाला मुख्यमंत्री येणार
बुधवार, 12 रोजी बक्षीस वितरण कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता होणार असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूलमंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याप्रसंगी सात वाजता पार्श्‍वगायक आदर्श शिंदे हे सीनेगीत सादर करतील. प्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.

माजी मंत्र्यांसह खासदारांनी केली पाहणी
महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी डी.एस.ग्राऊंड मैदानाची पाहणी केली तसेच दररोज नियोजना संदर्भात भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या जात आहेत. पाहणीप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, देवा वाणी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, विनीता सुनील नेवे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, महोत्सवास शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आमदार संजय सावकारे, महोत्सव प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील यांनी केले आहे.