67 टन कचर्याची विल्हेवाट ; स्वच्छतेबाबत बेगडीपणाचा आव आणणार्या सत्ताधार्यांसह प्रशासनाला चपराक
भुसावळ- स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळसह यावल शहरात रविवारी सकाळी साडेसात ते 11.30 दरम्यान स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सामाजिक बांधिलकी व समाज ऋणाची जाणीव ठेवून प्रतिष्ठानच्या वतीने या अभियानात सुमारे एक हजार 47 श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अचानक राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानामुळे बेगडीपणाचा आव आणणार्या सत्ताधार्यांसह प्रशासनाला मात्र चपराक असल्याची दिवसभर शहरात एकच चर्चा होती. स्वच्छता मोहिमेत यावल व भुसावळ शहरातील सुमारे एक लाख 40 हजार चौरस मीटर क्षेत्राचे शासकीय कार्यालयासह 29 कि. मी.चे प्रमुख रस्त्यांवरून सुमारे 67 टन कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली.
भुसावळात 36 टन कचर्याची विल्हेवाट
भुसावळ शहरामध्ये ग्रामीण व शहरी भागातील 539 श्री सदस्यांचा समावेश असलेली 16 पथके तयार केली होती. या पथकातील श्री सदस्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात सकाळी साडेसात वाजता साफसफाईला सुरुवात केली. अत्यंत सूक्ष्म नियोजन व शिस्तीत हे अभियान राबविण्यात आले. दुर्गंधीची तमा न बाळगता श्री सदस्यांनी गटारीतील घाण काढून रस्ते सफाई करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत रेल्वे स्टेशन ते नाहटा चौफुली, लोखंडी पूल ते गांधी चौक, यावल रोड ते गांधी चौक, मोरेश्वर नगर ते गांधी चौक व रेल्वे हॉस्पिटल ते कंडारी रोडपर्यंतचे 13 किलोमीटरचे रस्ते व 64 हजार चौ.मी. चा शासकीय कार्यालयाचा परीसर चकाचक करण्यात 36 टन कचरा शहराबाहेर फेकण्यात आला. यासाठी 18 ट्रॅक्टर व दोन डंपरचा वापर करण्यात आला.
यावलला 31 टन कचरा फेकला शहाराबाहेर
यावल शहरातील चोपडा नाका ते यावल महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती ते भुसावळ नाका, जुना भाजी बाजार ते बोरावल रोड व मनोहर उद्यान ते बोरावल रस्ता असे एकूण 12 किलोमीटचे रस्ते व 84 हजार 500 मीटर चौरस क्षेत्राचा शासकीय परीसर स्वच्छ करण्यात आला. यासाठी 508 श्री सदस्यांनी सहभाग घेऊन 31 टन कचरा शहराबाहेर फेकून त्याची विल्हेवाट लावली. यासाठी 26 ट्रॅक्टर व दोन जेसीबीचा वापर करण्यात आला. अनेक वर्षांपासून असलेली घाणदेखील साफ करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष कोळी व इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती.
शहरवासीयांतर्फे अभियानाचे कौतुक
स्वच्छता अभियानाबाबत बेगडीपणाचा आव आणणार्या नागरी प्रशासनाला ही चपराक असून न.पा. प्रशासनाने धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नियमित स्वच्छता अभियान राबवावे हाच संदेश या सामाजिक उपक्रमातून मिळतो. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या महास्वच्छता अभियानाचे लोकप्रतिनिधी, प्रशासन व शहरवासीयांनी तोंडभरून कौतुक केले.
शासकीय कार्यालयात स्वच्छता व जनजागृती
यावल व भुसावळ शहरातील पंचायत समिती, पोलीस ठाणे, बसस्थानक, गुरांचे दवाखाने, नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय, कृउबा समिती, कोर्ट परीसर, प्रांत व तहसील कार्यालय तसेच शासकीय विश्रामगृह येथे गटा-गटाने श्री सदस्यांनी वाढत्या तापमानाची पर्वा न करता स्वच्छता अभियान राबविले. यामुळे खर्या अर्थाने शहरवासीयांपर्यंत स्वच्छतेचा संदेश प्रतिष्ठान मात देण्यात आला. या अभियानात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. पर्यावरण बचाव, प्लास्टिक हटाव, स्वच्छता शिका-आरोग्याला जिंका, असे जनजागृतीपर फलक श्री सदस्यांनी हातात घेऊन जनजागृती केली.