परभणी-भूखंड घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. परभणीतील नानलपेठ पोलिसांनी ही कारवाई केली असून कर्मचारी गृहनिर्माण संस्थेचा भूखंड लाटल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गणेश दुधगावकर हे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदारही झाले. मात्र, चार वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायटीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी गणेश दुधगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तीन दिवसांपूर्वी एका तलाठीला देखील अटक करण्यात आली होती. आज पहाटे पोलिसांनी गणेश दुधगावकर यांना देखील अटक केली आहे.