भूमाफियांविरोधात शिरवणे गावातील ग्रामस्थ आक्रमक

0

नवी मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर जयवंत सुतार यांच्या विभागातच भूमाफियांनी अनधिकृत बांधकामाचा धडाका लावला आहे. ज्या इमारतींवर यापूर्वी तोडक कारवाई करण्यात आली आहे त्याच इमारती पुन्हा सर्व नियम धाब्यावर बसवून धूमधडाक्यात उभारण्यात येत आहेत. यावर विभाग अधिकारी व सत्ताधारी मूग गिळून गप्प असल्याने त्यांच्याच आशीर्वादाने सदरील बांधकामे करण्यात येत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. यासाठी स्थानिक नगरसेवक 50 ते 70 लाख, राष्ट्रवादी पदाधिकारी 50 लाख व इमारत संबंधित ग्रामस्थ 30 ते 40 लाख, अशी प्रती इमारत बांधकाम करण्यासाठी भूमाफियाबरोबर तोडपानी होत असल्याची चर्चा शिरवणे गावात होत आहे. या इमारती आज जरी उभ्या राहत असल्या, तरी भविष्यात यात राहायला येणार्‍या रहिवाशांची मोठी फसवणूक होणार असल्याची चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांचा धडाका उभारल्यानंतर अनेक भूमाफिया भूमिगत झाले होते.

त्या वेळी ज्या ज्या अनधिकृत इमारतींवर प्रशासनाचा हातोडा पडला त्यावेळी त्यातील गोरगरीब रहिवासी रस्त्यावर आला. याचाच फटका हजारो रहिवाशांना पडल्याने त्यावेळी त्या रहिवाशांकडून प्रशासनावर खापर फोडण्यात आले, तर अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. वेळीच जर प्रशासनाने लक्ष घातले तर गरिबांचे नुकसान होणार नाही. मात्र, त्याचवेळी प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आज तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा भूमाफियांनी डोके वर काढले आहे. आजमितीला अनेक कारवाई झालेल्या इमारती पुन्हा उभ्या राहू लागल्या आहेत, तर ज्यांना अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावरही कारवाई लांबणीवर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौर जयवंत सुतार हे नेरूळमधील शिरवणे गावात राहत असून त्याच गावातून ते अनेक वेळा निवडून आले आहे. त्यामुळे आजही त्यांच्या गावात त्यांचा दरारा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या घरापासून काही अंतरावरच अनधिकृत इमारतीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आशीर्वाद हॉस्पिटलच्या लगतच ही इमारत उभारण्यात येत असून यापूर्वीही या ठिकाणी 2 मजली इमारत उभारण्यात आली होती, तर त्यातील काही घरांची बुकिंगही घेण्यात आली होती.त्याचवेळी त्यावर हातोडा पडल्याने अनेकांचे लाखो रुपये पाण्यात गेले. त्यानंतर पुन्हा तुकाराम मुंढे यांच्या काळात तीच इमारत उभी करण्याचा प्रयत्न झाला. पण मुंढे यांची आक्रमकता पाहत त्यावेळी काम थांबवण्यात आले.

गरिबांना देशोधडीला लावणार का
त्यांची बदली होताच व आपल्या गावातलाच महापौर झाल्याची भावना लक्षात घेता भूमाफियाने पुन्हा डोके वर काढत त्याच इमारतीचे बांधकाम करायला सुरुवात केली. या इमारतीचे काम सुरू असून यातील काही दुकाने व घरे विक्री साठी तयार असल्याचे दिसून येत आहे. याच इमारतीला बांधकाम करताना अडथळा येऊ नये म्हणून स्थानिक नगरसेवक 50 ते 70 लाख, राष्ट्रवादी पदाधिकारी 50 लाख व इमारत संबंधित ग्रामस्थ 30 ते 40 लाख, अशी भूमाफिया बरोबर तोडपानी झाली असल्याची चर्चा शिरवणे गावात सुरू आहे, तर याविषयी अनधिकृत बांधकामाची माहिती नेरूळ विभाग अधिकारी संजय तायडे यांना असूनही त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांनाही सदरील भूमाफियाकडून मोठ्या प्रमाणात रसद पुरवण्यात येत असावी, असा संशय ग्रामस्थांना येत आहे. राजकीय नेते व भूमाफिया हे स्वतःच्या स्वार्थासाठी गरिबांना देशोधडीला लावणार का, असा प्रश्‍न आता शिरवणे गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शिरवणे गावात जी काही अनधिकृत बांधकामे होत आहेत त्यावर लक्ष ठेवणे माझे काम नाही, ते काम प्रशासनाचे आहे. त्यामुळे मी त्यावर काही सांगू शकत नाही, मीसुद्धा शिरवणे गावात झालेल्या अनेक अनधिकृत बांधकामाची यादी अतिक्रमण विभागाला दिली आहे. मात्र, त्यावर त्या विभागाकडून कोणतीही कारवाई नाही. जर अतिक्रमणे वाढत असतील तर अतिक्रमण विभाग करतो काय? त्यांनी याविषयी तपास करून कारवाई करावी माझा त्यात काही सहभाग नाही.
-जयवंत सुतार
महापौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असली, तरी आम्ही त्यावर नेहमी कारवाया करत आहोत. प्रती दिन दोन ते तीन ठिकाणी कारवाई होत आहे.शिरवणे गावात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यात येईल व त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जर महापौर जयवंत सुतार यांनी काही अनधिकृत बांधकामसंदर्भात निवेदन दिले असेल, तर त्यावरही
लक्ष देण्यात येईल.
-अंकुश चव्हाण
उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका.