भूमिगत मेट्रोचे काम दोन वर्षांत पूर्ण?

0

फडके हौद ते स्वारगेट मार्गात 2.37 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे

पुणे : भूमिगत मेट्रोच्या फडके हौद ते स्वारगेट या दुसर्‍या टप्प्यातील कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. येत्या दोन वर्षांत भूमिगत मेट्रोचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून या मार्गिकेमध्ये 2.37 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. टाटा गुलेरमार्क या कंपनीकडून हे काम होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारेगट ते पिंपरी-चिंचवड या दोन मार्गिकांची कामे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू आहेत. यातील वनाज ते रामवाडी ही मार्गिका उन्नत स्वरूपाची असून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचा काही भाग भूमिगत आहे. शेतकी महाविद्यालयापासून स्वारगेटपर्यंतचा हा एकूण 5.19 किलोमीटर लांबीची भूमिगत मेट्रो मार्गिका असणार आहे. भूमिगत मेट्रोच्या कामाच्या अनुषंगाने दोन कंपन्यांना दोन टप्प्यात ही कामे करण्यास महामेट्रोने मान्यता दिली आहे.

1 हजार 160 कोटींचा खर्च

मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात करण्यात आले आणि शेतकी महाविद्यालय ते फडके हौद चौक या पहिल्या टप्प्याच्या कामाला प्रारंभ झाला. त्यानंतर टाटा गुलेरमार्क या कंपनीला फडके हौद ते स्वारगेट या मार्गिकेचे काम देण्यात आले. या भूमिगत मेट्रो मार्गिकेची लांबी 4.74 किलोमीटर असून यात 2.37 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. फडकै हौद, मंडई, स्वारगेट येथे भूमिगत मेट्रो स्थानके आहेत. या प्रकल्पासाठी 1 हजार 160 कोटी रुपयांचा खर्च येणार त्यासाठी असून दोन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती महामेट्रोच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली.