भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट, 12 प्रवाशी जखमी

0

भोपाळ : भोपाळपासून 120 किलो मीटर अंतरावर कालापीपलमध्ये जबडी स्टेशनजवळ भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत जोरदार स्फोट झाला. ही रेल्वे भोपाळहून उज्जैनकडे निघाली होती. स्फोट सकाळी साडेनऊ वाजता जनरल बोगीत झाला. स्फोटात 12 प्रवाशी जखमी झाले. मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, स्फोटानंतर गनपावडरचा वास येत होता. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

जखमींवर उपचार सुरू
इंदौर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कुमार जयंत यांनी सांगितले की, भोपाळहून उज्जैनकडे जात असलेल्या पॅसेंजर गाडीच्या 59320 क्रमांकाच्या डब्ब्यात जबडी रेल्वे स्टेशनजवळ स्फोट झाला. स्फोटात जखमी प्रवाशांना उपचारासाठी कालापीपल आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजलेले नाही. स्फोटानंतर जनरल डब्ब्याच्या काचा फुटल्या व धुर पसरला होता. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली. घटनेनंतर दोन डबे वेगळे करून गाडी पुढे पाठविण्यात आली.

सुटकेसचा स्फोट
स्फोटातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच शुजालपुरहून मदत पथक घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान, या रेल्वेतून प्रवास करणार्‍या काही प्रवाशांनी सांगितले की, रेल्वे सीहोर स्टेशन सोडून पेढे गेल्यानंतर कालपीपलपुर्वी जबडी स्टेशनवर पोहचताच स्फोट झाला. स्फोटानंतर डब्ब्यात आगही लागली. लोक जीव वाचविण्यासाठी रेल्वेतून उड्या मारत होते. यामध्येही काहीजण जखमी झाले. एका सुटकेसचा स्फोट झाल्याचेही काहीजण सांगत होते.