जळगाव । वडिलांच्या मृत्युनंतर कुटुंबियांवर कोसळलेले दु:ख सावरत नाही तोच पुत्रावर काळाने घाला घातल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सावित्रीनगरात शोककळा पसरलेली आहे. जुना नशिराबाद रोड जवळील सावित्रीनगरातील रहिवासी दामु पुंडलिक पाटील (वय-75) यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या दु:खातून कुटुंबिय सावरत नाही तोच म्हणजेच तिसर्याच दिवशी त्यांचा मुलगा कमलाकर दामु पाटील (वय-39) यांच्यावर काळाने घाला घातला. दुपारच्या सुमारास ते झोपलेले असता अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले व काही मिनिटातच त्यांची प्राणज्योत मालवली.
सावित्रीनगरात पसरली शोककळा
वडिलांच्या मयतानंतर मुलाच्या जाण्याने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कमलाकर पाटील हे मुळ कडगाव येथील रहिवासी असून ते गेल्या एक ते दोन पिढ्यांपासून जळगावात स्थायिक झालेले होते़ कमलाकर पाटील हे रेमंड कंपनीत कामाला होते़ त्यांच्या वडिलांचे 11 रोजी निधन झाले़ त्यामुळे ते सध्या घरीच सुटीवर होते़ वडिलांचे अचानक जाण्याने सर्व कुटुंब दु:खात होते. अशा अवस्थेत नियतिने या कुटुंबियांचा आधार असलेल्या कमलाकरवरच घाला घातल्याने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे़ कमलाकर यांना दोन मुले असून मोठा मुलगा युगल हा बारा वर्षांचा आहे तर, लहान पियुष हा सहा वर्षांचा आहे. छोट्याशा या पाटील कुटुंबियांच्या जगण्याचा आधारच नियतिने हिरावून घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कमलाकर यांच्या पश्चात आई, आजी, दोन मुले, बहिण असा परिवार आहे़ दरम्यान, त्यांच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रसंगी नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात एकच गर्दी केली. या ठिकाणी कमलाकर पाटील यांच्या कुटुंबियांसह नातेवाईक व मित्र परिवाराने आक्रोश व्यक्त केला.