आमदार लांडगे यांच्या अधिकार्यांना सूचना
भोसरी : परिसराच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोणालाही पाणी पाणी कमी पडणार नाही, याची दक्षात घेण्यात यावी. नागरिकांच्या पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ देऊ नका. नागरिकांना स्वच्छ, मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करा, अशा कडक सूचना आमदार महेश लांडगे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना केल्या आहेत. भोसरीतील पाणीपुरवठ्या संदर्भात आमदार लांडगे यांनी मंगळवारी ‘ई’ क्षत्रिय कार्यालयात पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, वाॅलमान आणि नगरसेवक यांची एकत्रित बैठक घेतली.
या बैठकीला ‘ई’ क्षेत्रीय कार्यलयाच्या अध्यक्षा भीमाबाई फुगे, ‘फ’ कार्यालयाच्या अध्यक्षा कमल घोलप, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, नगरसेवक नितीन लांडगे, संतोष लोंढे, राहुल जाधव, सागर गवळी, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, वसंत बोराटे, नगरसेविका अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, निर्मला गायकवाड, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, सोनाली गव्हाणे, प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, सागर हिंगणे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, सचिन तापकीर, नितीन बोराटे, पाणीपुरवठा अधिकारी एस. ए. तुपसाखरे, व्ही. बी. शिंदे, वि. भी. कांबळे आदी उपस्थित होते.
पाण्यासंदर्भात तक्रारी नकोत
यावेळी आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडकारची तहान भागविणार्या पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. भोसरी परिसरातील काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. वॉलमान, अधिकारी यांनी जागेवर जाऊन पाणीपुरवठा कमी दाबाने का होत आहे, याची पाहणी करावी. काय अडचण असेल ती त्वरित सोडवावी. महापालिकेच्या पाईपलाइन, व्हॉल्व्ह, पाण्याच्या टाक्यांजवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. काही प्रभागात सकाळी सहा ते नऊ या वेळेत तर काही भागात संध्याकाळी सहा ते नऊ यावेळेत पाणी सोडावे. तसेच नागरिकांनीही पाणी जपून वापराावे. पाण्यासंदर्भात तक्रारी येता कामा नये. दूषित पाणीपुरवठा होऊ नये. पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या टाक्या साफ करण्यात याव्यात
नगरसेवकांची जबाबदारी
आमदार लांडगे यांनी नगरसेवकांना सांगितले की, प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकांनी अधिकार्यांबरोबर जाऊन पाणी आले की नाही हे बघावे. दूषित, ड्रेनेज मिश्रीत पाणी पुरवठा होता कामा नये याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ, मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा आशा कडक सूचना लांडगे यांनी अधिकार्यांना केल्या आहेत.पाणीपुरवठा या बाबत तक्रारी येता कामा नयेत याची दक्षता घ्यावी, असेही आमदार लांडगे म्हणाले.