राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांची टीका
पिंपरी-चिंचवड : संतांची भूमी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भोसरी परिसराला आता गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात ग्रासलेले आहेत. भयमुक्त भोसरी ही घोषणा देऊन सत्तेत आलेली मंडळी गुंडांचे पाठीराखे झालेले दिसतात. गल्लो-गल्ली दादागिरी वाढली आहे. वाहनांच्या तोड-फोडीच्या घटना सतत भोसरी येथे घडत आहेत. तसेच या कामगार नगरीतील लोकांची लुटमार करणे, येथील टपरीचालकांकडून हप्ते वसूल करणे हा धंदा गावगुंडांकडून रोजरोसपणे सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी एका पत्रकाव्दारे केली आहे. तसेच सध्या संपूर्ण भोसरी परिसरातील रहिवासी दहशतीच्या वातावरणात असून कुठे गेले ते अच्छे दिन? असा सवालही केला आहे.
आमदारांना गांभीर्यच नाही
पत्रकात म्हटले आहे की, संतांची भूमी म्हणून ओळखणार्या भोसरीची ओळख आता गावगुंडांचा अड्डा म्हणून होत आहे. गेल्या चार वर्षात खून, चोरी, हाणामारी अशा घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तर वाहनाची तोड-फोड करून छोट्या-मोठ्या टोळ्या उदयास येत आहेत. गेल्या 10 दिवसात भोसरीतील आदिनाथ नगर या भागात वाहन तोड-फोडीच्या घटना दोनदा घडल्या आहेत. स्थानिक आमदार व खासदार तसेच महानगर पालिकेतील सत्ता उपभोगत असलेल्यांना याचे कसलेच गांभीर्य नाही. वारंवार होत असलेल्या तोड-फोडीच्या घटनांमुळे येथील नागरीक आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. ही बाब शहराच्या हितासाठी योग्य नसून भोसरीतील कायदा व सुव्यवस्था कडक करण्यासाठीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही लांडे यांनी म्हटले आहे.