भोसरी परिसरामध्ये पाण्याअभावी हाल

0

दुरूस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद

भोसरी : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे. उन्हाने अंगाची होणारी लाही लाही आणि त्यात दुरुस्तीच्या कामासाठी भोसरीसह चिखली, चर्‍होली परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांचे हाल झाले आहेत. त्यातच महापालिका गुरुवारी (दि. 26) पुन्हा पाण्याचे शटडाऊन घेणार असल्याने शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गवळी माथा येथील महापालिकेचा पंपिंग विद्युत पॅनल खराब झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी या पंपिंगवर अवलंबून असणारा चक्रपाणी वसाहत, धावडे वस्ती, लांडगेनगर, सेक्टर क्रमांक 1, गुरुविहार, लांडगेवस्ती, सद्गुरुनगर, चर्‍होली, मोशी, बोजहाडेवाडी, भगतवस्ती, गुळवेवस्ती, सेक्टर क्रमांक 4 व 6, जय गणेश साम्राज्य आदी भागाला मंगळवारी दिवसभर विस्कळीत पाणीपुरवठा झाला. काही भागात पाणीच आले नाही. तसेच बुधवारी काही भागाला कमी दाबाने, तर काही भागाला पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे नागरिकांचे
पाण्यासाठी मोठ्याप्रमाणात हाल झाले. दरम्यान, महापालिकेने गुरुवारी संपूर्ण शहरात दुरुस्तीच्या कामासाठी पाणी बंद जाहीर केले आहे. शुक्रवारीदेखील कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार्‍या भोसरी, चजहोली, मोशीकरांच्या पोटात अक्षरश: गोळा आला आहे.

तळपते ऊन आणि त्यात सलग दोन दिवस पाण्याची बोंब झाल्याने भोसरीकरांचे अतोनात हाल झाले. भगतवस्ती, गुळवेवस्ती, वडमुखवाडी, बोपखेल, गंधर्वनगरी, काळी भिंत, दत्तनगर, लक्ष्मीनगर, ताजणेमळा, पठारे मळा येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. 24 तास पाणीपुरवठा प्रस्तावित असला, तरी आधीच फ्लेक्सबाजी झालेल्या दिघीतही नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागला.