भोसरी प्रकरणातील झोटींग समितीतर्फे उद्या होणार पुन्हा तपासणी

0

नागपूर । भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी नेमण्यात आलेली झोटींग समिती मंगळवारीदेखील माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची चौकशी करणार आहे. दरम्यान सोमवारी समितीकडून विचारणा करण्यात आलेल्या काही मुद्यांवर खडसेंकडून बगल देण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच झोटींग समितीने शासनाच्या निश्चित केलेल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी केली.

झोटींग समिती करतेय चौकशी
आ. खडसे यांनी पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती झोटींग समिती गठित करण्यात आली. समिती गेल्या आठ महिन्यापासून चौकशी करीत आहे. जागेशी संबंधित महसूल आणि एमआयडीसीकडून कागदपत्र समितीने तपासले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले. यावर आक्षेप नोंदविला होता.

काही मुद्यांवरून टाळाटाळ
झोटींग समितीसमोर खडसेंनी जमिनीच्या व्यवहाराबाबत आपला संबंध नसल्याची साक्ष दिल्याचे एमआयडीसीचे वकिल चंद्रशेखर जलतारे यांनी सांगितले. खडसेंनी पूर्वीच्या पवित्र्यापासून घुमजाव केल्याचेही त्यांचे म्हणणे होते. दरम्यान सोमवारी पुन्हा समितीसमक्ष सुनावणी झाली. समितीकडून अनेक प्रश्न खडसेंना विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांवर खडसेंकडून टाळाटाळीचे उत्तर दिल्याचे सूत्रांकडून समजते.

तपास अंतिम टप्प्यात
झोटींग मितीने चौकशी करताना शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या मुद्यांव्यतिरिक्तही अनेक मुद्यांवर तपास केला असून यावर खडसेंनी आक्षेप घेत नव्याने काही मुद्यांचा समावेश करण्याचा अर्ज दिला. तर समितीला आणखीही काही प्रश्नांचा खुलासा करायचा आहे. त्यामुळे आता मंगळवारला पुन्हा सुनावणी होणार आहे. मंगळवारची सुनावणी अंतिम ठरवण्याशी शक्यता आहे. त्यानंतर समिती अहवाल तयार करून शासनाला पाठविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.