नंदुरबार । नगरपालिकेच्या कामात होणार्या भ्रष्टाचारबाबत प्रश्न उपस्थित केला म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकानी भाजपच्या आदिवासी नगरसेविका आणि त्यांच्या पतीवर हल्ला केला, या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत, अशी भावना भाजपचे नेते रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी भाजपच्या प्रवक्त्या कांता ताई नलावडे, आमदार शिरीष चौधरी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, संगीता सोनवणे, गौरव चौधरी, निलेश माळी, आदी उपस्थित होते.
मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न!
नगरपालिकेच्या सभेत मंगळवारी झालेल्या घटनेबाबत रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली, ते म्हणाले की अजेंड्यावरील विषय क्रमांक 3 व 4 बाबत भाजपच्या नगरसेवकानी प्रश्न उपस्थित केला. त्याचा राग येऊन काँगेस नगरसेवकानी धुमाकूळ घालत मारहाण केली. आदिवासी महिला नगरसेविका संगीता सोनवणे यांना ही गलिच्छ पध्दतीने मारहाण झाली, हा प्रकार लोकशाही ला घातक असा आहे, याचा आम्ही निषेध करतो, नगरपालिकेच्या मालकीची करोडो रुपयाची मालमत्ता आ,चंद्रकांत रघुवंशी यांच्या बगल समर्थकांनी हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. ते विचारणे जर तो गुन्हा असेल तर आम्ही करणारच आणि यापुढे असला प्रकारआम्ही सहन करणार नाही, असा इशारा रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
काँग्रेस नगरसेविका सोनिया राजपूत यांची फिर्याद
पालिका हाणामारी संदर्भात काँग्रेसच्या नगरसेविका सोनिया राजपूत (पाडवी) यांनी सायंकाळी उशीरा नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार पालिकेची सभा सुरू असताना विरोधी पक्ष भाजपच्या नगरसेविका संगिताबाई सोनवणे यांचे पती आनंद चौधरी हे व संतोष वसईकर, नयन चौधरी, गणेश चौधरी, केतन रघुवंशी, लक्ष्मण माळी व अन्य दहा ते बारा लोकांनी अनधिकृतपणे सभागृहात प्रवेश केला. या सभेत गौरव चौधरी, निलेश माळी, आनंद माळी हे नगरपालिकेचे सदस्य असल्याने आधीपासूनच सभागृहात हजर होते. वरील सर्वांनी अजेंड्यावरून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असताना त्यांना बोलण्याचा राग आल्याने त्यांनी हल्ला चढविला. आनंद चौधरी यांनी शिवीगाळ केली. केतन रघुवंशी यांनी या लोकांना प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावेळी प्रितम ढंढोरे, यशवर्धन रघुवंशी, अमित रघुवंशी हे वाचविण्यासाठी आले असता लक्ष्मण माळी, गणेश चौधरी व केतन रघुवंशी यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार दरोडा, विनयभंग व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.