आतापर्यंतच्या अध्यक्षांच्या काराभाराची चौकशी करण्याची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी स्वत:चा भ्रष्टाचार, गैरकारभार लपवण्यासाठी पोकळ धमक्या देणे बंद करावे. भाजपमध्ये हिंमत असेल तर आजपर्यंतच्या पालिकेच्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरकारभाराची चौकशी करावी. भाजपचे कारभारी असलेले दोन्ही आमदार देखील स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या निर्णयांची चौकशी करायची म्हटल्यावर भाजपला आपल्या नेत्यांची देखल चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचीच चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
एक वर्ष होऊनही कारवाई नाही
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची 15 वर्षे सत्ता होती. या कार्यकाळातील अनेक गैरव्यवहार व भ्रष्ट्रचाराबाबत भाजपच्या पदाधिकार्यांनी आवाज उठविला होता. फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीत भ्रष्टाचार व गैरकारभाराचा मुद्दा करुन, भय, भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचे आश्वासन देत भाजपने भरभरुन मते घेतली व सत्ता संपन्न केली. परंतु, भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरीदेखील राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढली जात नाहीत.
भ्रष्टाचाराचे लायसेन्स नाही दिले!
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकाळात गैरप्रकार, भ्रष्टाचार होताच म्हणून भ्रष्टाचार करण्याचे भाजपला लायसन्स दिले नाही. भाजप करत असलेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाराबाबत कोणी काही बोलले, तर त्यांच्या कुंडल्या काढू, त्यांच्या फाईल्स काढू अशा धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे भाजपमध्ये खरीच हिम्मत असेल तर माजी स्थायी समिती अध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे, नवनाथ जगताप, खासदार श्रीरंग बारणे, योगेश बहल, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, अजित गव्हाणे, डब्बू आसवानी, जगदीश शेट्टी, राजेंद्र राजापुरे यांच्यासह सर्वंच स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यकाळातील निर्णयांची सविस्तर चौकशी करावी. त्याचबरोबर विद्यमान स्थायी समिती अध्यक्षांच्याही कार्यकाळातील निर्णयांची सविस्तर चौकशी करावी.
पारदर्शकता दाखवून द्यावी!
वस्तुनिष्ठ अहवाल जनतेसमोर ठेवून भाजपने आपली पारर्दशकता दाखवून द्यावी. उगाच गैरव्यवहार लपविण्यासाठी पोकळ धमक्या देऊ नयेत. अन्यथा आपल्या शहरातील जनता सुजाण व सुज्ञ आहे. नागरिक आपल्याला आपली योग्य जागा कुठे आहे ते दाखवून देतील. यात तिळमात्र शंका नाही, असेही भापकर यांनी म्हटले आहे.