मंगरूळ खून प्रकरणातील दोघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

पारोळा- तालुक्यातील मंगरूळ येथे तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधातून व तिला पळवून नेल्याच्या संशयातून कैलास श्रीकृष्ण पाटील (38) यांचा डोक्याला लाकडी दांडका मारून बुधवारी सकाळी 11 वाजता खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींसह अन्य एका अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले होते. दोघा आरोपींना न्यायालयाने 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

चिमुकल्या वैष्णवीच्या माहितीनंतर खुनाचा उलगडा
आरोपी भाऊसाहेब उर्फ युवराज माधवराव पाटील, सूर्यभान उर्फ पिंटू माधवराव पाटील व अन्य एक अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबातील तरुणीशी मयत कैलास पाटील याचे प्रेमसंबंध असल्याचा तसेच तिला पळवून नेल्याच्या संशयातून आरोपींनी बुधवारी सकाळी युवराज पाटील यांच्या डोक्यावर, पाठिवर लाकडी दांड्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती शिवाय अन्य दोघा आरोपींनी लाथाबुक्क्यांनी पोटात, तोंडावर मारहाण केल्याने कैलासचा मृत्यू झाला होता. मयत कैलास यांची मुलगी वैष्णवी हिने वडिलांना होत असलेल्या मारहाणीसंदर्भात पारोळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर खुनाचा उलगडा झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली होती. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सानप करीत आहेत.