डीआरएम आर.के.यादव यांनी दिले एक हजारांचे बक्षीस
भुसावळ:- अप 12618 मंगला एक्स्प्रेसमधील सतर्क तिकीट निरीक्षकामुळे गाडीचा संभाव्य अपघात टळल्यानंतर संबंधित तिकीट निरीक्षकाचा मंगळवारी भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी प्रमाणपत्र व एक हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला. सोमवारी पहाटे 6.40 वाजता नाशिक रेल्वे स्थानकात मंगला-लक्षद्वीप ही एक्स्प्रेस गाडी प्रवेश करीत असताना एका चाकाची स्प्रिंग निखळल्याचे व रेल्वे रूळाखालील गिट्टी उडत असल्याचेगाडीतील तिकीट निरीक्षक व्ही.टी.मसराम यांच्या लक्षात आल्याने त्यांनी चैन पुलिंग करून गाडी थांबवली होती.
सहकारी तिकीट निरीक्षकासह लोको पायलटलाही सूचना दिल्यानंतर गाडी पुढे नेण्यास धोका असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नियंत्रण कक्षाला माहिती कळवण्यात आली होती तर संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास काम पूर्ण केल्यानंतर एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली होती. दरम्यान, तिकीट निरीक्षकाने दाखवलेल्या समय सूचकतेची दखल घेत डीआरएम यादव यांनी मसराम यांना मंगळवारी डीआरएम कार्यालयात सन्मानीत केले. याप्रसंगी मुख्य मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा उपस्थित होते.