मंगल कार्याबरोबर श्राद्धासाठीही आता केटरर्सची सेवा

0

संस्काराची शिदोरी कमी होतेय : नोकरदार महिलांसाठी काळाची गरज

पुणे । डॉ. मेधा खोले यांच्या ‘सोवळे’ प्रकरणावरून रान उठले. परंपरावाद्यांनी त्याला संस्काराचा भाग म्हणून याचे समर्थन केले तर दुसरीकडे पुरोगामी लोकांनी मनुवादी व्यवस्थेचे समर्थन म्हणून खंडन केले. हा योग्य-अयोग्याचा वाद बाजूला ठेवला तरी एक रंजक गोष्ट यातून समोर आली आहे. आणि ती म्हणजे; आतापर्यंत मंगल कार्यासाठी केटरर्सच्या भोजनाला पसंती दिली जात होती. मात्र, आता श्राद्धाच्या स्वयंपाकाची घरपोच सेवा उपलब्ध करून देणार्‍या केटरर्सलाही उपनगर आणि परिसरामध्ये प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.

परंपरेनुसार कोणते पदार्थ बनवले जातात, ते कसे बनवायचे असतात आणि मुख्य म्हणजे ते अधिक प्रमाण बनवायचे असल्यास त्या जेवणाचा घाट आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी नोकरी करणार्‍या महिलांना शक्य होत नाही. त्यामुळेच अलिकडे केटरर्सच्या स्वयंपाकाला पसंती आहे. आतापर्यंत घरामध्ये वडीलधार्‍यांमुळे गृहिणीला घराण्यातील संस्कारांची शिदोरी आयतीच मिळत होती. त्याप्रमाणे अशा कामांसाठी ज्येष्ठांची मदतही घेतली जात होती. शहरवासियांची नेमकी ही गरज ओळखून यावर्षी काही केटरर्सनी श्राद्धाचा स्वयंपाक घरपोच देण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत असल्याचे उपनगरातील केटरर्सनी सांगितले.

केटरिंग व्यवसायातील दयाराम क्षीरसागर म्हणाले की, श्राद्धाच्या भोजनामध्ये भरडाचा वडा, तांदळाची खीर आणि आमसुलाची चटणी या तीन पदार्थांना विशेष महत्त्व असते. याशिवाय विशिष्ट पाच भाज्या, पडवळ घालून केलेली कढी, चटणी, कोशिंबीर, भात-वरण, पोळी असे विविध १३ जिन्नस पानामध्ये दिले जातात. ताटानुसार साधारण शंभर रुपयांपासून दर आकारला जातो आणि घरपोच सेवा दिली जाते. पाच व्यक्तींपासून ते दोनशे-अडीचशे मंडळींच्या पानांची ऑर्डर स्वीकारली जाते.

घरामध्ये सासूबाईंचे निधन झाल्यानंतर मला अशी सेवा मिळू शकली नाही. त्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळलो, असे या क्षेत्रातील काही महिलांनी सांगितले. कितीही लोक जेवणारे असोत, आम्ही ऑर्डर स्वीकारतो. तुमच्या वेळेमध्ये स्वच्छ, ताजा आणि गरम स्वयंपाक घरपोच देण्याची आमची जबाबदारी असते. या व्यवसायामध्ये कष्ट भरपूर आहेत, स्वतः जातीने लक्ष द्यावे लागते. दुसर्‍यावर अवलंबून राहून चालत नाही, असेही केटरर्सनी सांगितले.

२०-२५ जणांचीही ऑर्डर
गेल्या अनेक वर्षांपासून केटरर्सचा व्यवसाय आम्ही करीत आहोत. मात्र, श्राद्धाच्या जेवणाच्या ऑर्डर्स अलिकडे मिळू लागल्या आहेत. साधारणतः २०-२५ मंडळींच्या जेवणाची ऑर्डर असली तरी आम्ही ती स्वीकारतो. प्रत्येकाच्या खिशालाही परवडले पाहिजे, याचा आम्ही विचार करतो. श्राद्धाच्या ऑर्डरमुळे ओळखी होतात आणि वाढदिवस वा मंगल कार्याच्या ऑर्डर्सही सहज मिळून जातात. ना नफा ना तोटा या तत्त्वावर कधी कधी हा व्यवसाय करावा लागतो. आचार्‍यांचीही या कामासाठी मदत घ्यावी लागते.

इव्हेंट मॅनेजमेंटला पसंती
धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कुटुंबासाठी वेळ कमी मिळत असल्याचे बोलले जात आहे. छोटे कुटुंब आणि वाढत्या शहरीकरणामुळे वडिलधार्‍या मंडळींचे मार्गदर्शन कमी पडू लागले आहे. या प्रकारामुळेच अलिकडे प्रत्येक क्षेत्रात इव्हेंट मॅनेजमेंटने शिरकाव केला आहे. कोणत्याही कामाचे थेट कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि मोकळे व्हायचे असा प्रकार सुरू झाला आहे. लग्न, मुंज, वाढदिवस असे अनेक छोटेमोठे कार्यक्रमाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पती-पत्नी दोघेही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर असतात, त्यामुळे ही कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही, असे सांगितले जात आहे.