मुंबई । विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह तसेच मंडईच्या इमारतीच्या पुनर्विकास रखडला आहे. या पुनर्विकासाच्या कामासाठी नेमणूक करण्यात आलेल्या विकासावर पालिका मेहरबान झाली असून दिरंगाई करणार्या या कंत्राटदारालाच पुन्हा काम देण्याचा घाट घातला आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी दीनानाथ मंगेशकर म्युनिसिपल मार्केट व्यापारी संघाने मंथन बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची निवड केली होती. महापालिकेने याला मंजुरीही दिली होती. परंतु 2013पर्यंत या विकासकाने काहीच काम केले नाही. त्यामुळे मंडई आणि नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर महापालिकेचेच 14 कोटी रुपये.
मंडईच्या पुनर्विकासाचे अधिकार विकासकाकडेच
दरम्यान, या वास्तूसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराने ही वास्तू मजबूत असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यामुळे मंडईचा पुनर्विकास रद्द करुन ती महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सुधार समितीने मात्र याला मंजुरी न देता मंडईच्या पुनर्विकासाचे अधिकार विकासकाकडेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची संपूर्ण जबाबदारी ही विकासकाकडे असून यासंदर्भातील कोणत्याही कामासाठी महापालिका वारंवार हात वर करत असते. परंतु, आता त्याच महापालिकेने स्वखर्चाने नाट्यगृह आणि मंडईसाठी सुरक्षा यंत्रणेची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ईगल सिक्युरिटीज नावाच्या खासगी सुरक्षा कंपनीची निवडही करण्यात आलेली आहे. यासाठी 77 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कंत्राटदराने पुनर्विकासात दिरंगाई केली होती. त्याच कंत्राटदाराला तीन वर्षांकरता खासगी सुरक्षा सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.