जळगाव । आवर्षण, भूगर्भातला घटत चाललेला जलस्तर या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या आहेत. समस्येवर समाधान शोधण्याच्या दिशेने एक प्रयत्न आणि भविष्यातील देशासाठी याबाबतीतली जागरुक पिढी घडवण्यासाठी म्हणून पुण्यात एक राज्यस्तरीय स्पर्धा झाली. ‘वनराई’ ही पर्यावरण क्षेत्रातली ख्यातनाम संस्था, ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान आणि पुणे रोटरी क्लबच्या संयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून तिस हजारांवर विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे जळगावची इयत्ता दहावीतील मंजिरी प्रफुल्ल भोरटके ही विद्यार्थिनी भित्तिचित्र स्पर्धेत राज्यात पहिली ठरली. मंजिरीला त्याबद्दल तिन लाख रुपयांची शिष्यवृत्ती लाभलेली आहे.
विजेत्यांना बक्षिसाचे वितरण
इंद्रायणी नदीच्या काठावर श्री क्षेत्र तुळापूर येथील सागरमित्र प्रतिष्ठान संचलित विश्वसंस्कृती आश्रमात त्यासाठीची अंतिम स्पर्धा झाली. मंजिरी ही जळगावातील नंदिनीबाई वामनराव विद्यालयाची विद्यार्थिनी असून, जयकिसनवाडीतील रहिवासी प्रफुल्ल भोरटके यांची कन्या आहे. पाणी या विषयावर काम करणार्या अनुभवसमृद्ध तज्ज्ञांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. एनरिचा फाऊंडेशनचे डॉ. दिनेश नेहेते, जलऋषी विनोद बोधनकर यांच्या उपस्थितीत अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या भित्तिचित्राचे सादरीकरण केले. पाचवी ते दहावी या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती.
विजेत्यांना बक्षिसाचे वितरण
कणकवली येथील हर्षद मिस्त्री याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. पुण्यातील सिद्धी मांगले हिला तृतीय बक्षीस देण्यात आले. पाचवी ते सातवी गटात रवींद्र मुंडे, ईश्वरी व्यास, ऋतुजा बदक हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले. रोटरीचे दीप्ती पुजारी, मोहन पालेशा, अमेय उपाध्ये, मोहन पुजारी, वनराईचे रवींद्र धारिया यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. कार्यक्रमानंतर मुलांना संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घडवण्यात आले.