नंदुरबार : कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड रुग्णालयांसाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली असून जिल्हा प्रशासनाकडून मंजूर करण्यात आलेले दर रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
खाजगी कोविड रुग्णालयांना मंजूर दरापेक्षा अधिकचे दर आकारता येणार नाहीत व त्याबाबत कुठलीही तक्रार येणार नाही याची दक्षता रुग्णालय व्यवस्थापनाने घ्यावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागावर ऑक्सिजन आणि नॉन ऑक्सिजन बेडची संख्या, रुग्ण उपचार घेत असलेल्या बेडची संख्या व रिक्त बेडची संख्या दर्शविणारा फलक लावावा.
रुग्णालयात तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लावावी. संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांची नियंत्रण व पर्यवेक्षणासाठी समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांनी वेळोवेळी वरील बाबींची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास त्याबाबतचा अहवाल जिल्हा दरपत्रक समितीकडे सादर करावा.
कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.