मुंबई : हिवाळी अधिवेशनात मराठी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना, दुसरीरकडे आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींचा ‘उलगुलान’ मोर्चा मुंबईत धडकला आहे. या मोर्च्यातील एका पीडिताने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईमध्ये राहत असलेल्या संतोष मोहिते याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेतले. पोलिसांनी हे दृश्य पाहताच त्वरित मोहिते यांना ताब्यात घेतले. नवी मुंबईमधल्या एका बिल्डरने मोहिते यांना १८ लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार त्यांनी केली. यासंदर्भात वारंवार मंत्रालयाच थेटे घालूनही नुकसान भरपाई मिळत नव्हती. त्यामुळे नाराज होऊन मी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं मोहिते यांनी सांगितलं. मंत्रालय आणि विधानभवन परिसरात अधिवेशनामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, इतका बंदोबस्त असतानाही संतोष मोहिते यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विविध चर्चा होत आहेत.