मंत्रालयाच्या समोर वृद्ध महिलेने घेतले विष!

0

मुंबई : धुळ्यातील वृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच, मंत्रालयासमोर शुक्रवारी आणखी एका वृद्ध महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. शकुबाई कारभारी झाल्टे (60) असे या वृद्धेचे नाव असून, त्या नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील वडगाव पंगू गावातील आहेत. कुटुंबातील जमिनीच्या वाटणीचा वाद मिटवण्यासाठी शकुबाई सतत मंत्रालयाचे खेटे मारत होत्या. मात्र अनेक अधिकार्‍यांकडे पत्रव्यवहार करूनही काम होत नसल्याने त्याला कंटाळून साडेचार वाजण्याच्या सुमारास मंत्रालयाजवळील रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घडली तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता.

काय आहे नेमके प्रकरण?
शकुबाई यांचे सासरे भिका लक्ष्मण झाल्टे यांची 3 हेक्टर 57 गुंठे जमीन असून, या जमिनीच्या वाटणीवरून 1947 पासून चुलत कुटुंबाशी वाद सुरू आहे. 7/12 उतार्‍यावर दुसर्‍या गटातील सुनील वाल्मिकी झाल्टे व अन्य 7 जणांची नावे आहेत. हा वाद सरकार दफ्तरी गेला असता प्रांताधिकार्‍यांनी शकुबाई यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर त्यांना जमिनीचा ताबा देण्यासाठी पोलिस फौजफाटाही पाठवण्यात आला होता. मात्र, सुनील यांच्या गटाने उपजिल्हाधिकार्‍यांकडे आव्हान दिले असता, त्यांनी प्रांताधिकार्‍यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे या जमिनीचा वाद भिजत पडला आहे. याप्रकरणी त्यांनी मंत्रालयातही अर्ज दिले. परंतु, त्यांना न्याय मिळाला नाही.

खोकल्याचे औषध प्राशन; आत्महत्येचा बनाव!
शकुबाई झाल्टे आणि त्यांचा मुलगा शुक्रवारी दुपारी मंत्रालयाबाहेर आले. दिराने जमीन हडपली असून, या प्रकरणात न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी होती. सदर महिला दुपारी मंत्रालयाबाहेर विधानभवनासमोरील रस्त्यावर आली. तिने काचेची बाटली तोंडाला लावली, यावेळी तिच्या एकंदर देहबोलीवरुन इतरांना संशय आला. रस्त्यात ती कोसळल्याने तिने आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, तपासाअंती तिने कफ सिरप प्यायलाचे उघड झाले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे हा खरंच आत्महत्येचा प्रयत्न होता की बनाव होता की लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होता, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.