मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवुक करणार्‍या भामट्याला अटक

0

मुंबई – मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक करणार्‍या एका भामट्याला काल मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. मोरेश्‍वर शंकर चौरगे असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार आपल्या कुटुंबियांसोबत दक्षिण मुंबईत राहतात. गेल्या वर्षी त्यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला होता.

मंत्रालयात काम करणारा मोरेश्‍वर चौरगे हा तिथे कामाला लावतो. त्याची मंत्रालयात ओळख असल्याने त्याने त्याची भेट घेऊन नोकरीविषयी चर्चा करावी असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मोरेश्‍वर फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. 14 मे 2016 रोजी ते मोरेश्‍वर यशवंतराव चव्हाण सेंटरजवळ भेटले. या भेटीत मोरेश्‍वर आपण जलसंपदा विभागात क्लार्क म्हणून काम करीत असून मंत्रालयात पीडब्ल्यूडी विभागात तीन जागा खाली आहे. त्यातील एका जागेवर त्यांना नोकरी मिळवून देतो असे सांगितले. याकामासाठी त्याने त्यांच्याकडे साडेतीन लाख रुपये मागितले होते. या घटनेनंतर त्यांनी पत्नी आणि बहिणीशी चर्चा करुन मोरेश्‍वरला नोकरीसाठी अडीच लाख रुपये तसेच त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्रे दिले होते. एका महिन्यांत नोकरी मिळेल असे त्याने सांगितले होते, मात्र नंतर त्याने त्याचा फोन बंद केला होता. वडाळा येथील त्याच्या राहत्या घरी जाऊन त्यांनी मोरेश्‍वरवर चौकशी केली. यावेळी त्याच्या घरच्या लोकांनी त्याला चार वर्षांपूर्वीच घरातून काढून टाकल्याचे सांगून त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असे सांगितले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच मोरेश्‍वरला काल मरिनड्राईव्ह पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात मोरेश्‍वर हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने अनेकांना मंत्रालयासह इतर शासकीय कार्यालयात नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातला आहे. यातील काही गुन्ह्यांत त्याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.