मंत्रालयासमोर अंधांवर केला पोलिसी बळाचा वापर!

0

माणूसकीला काळीमा फासणारी घटना

मुंबई :- आपल्या मागण्या मांडण्यासाठी मंत्रालयाच्या दारासमोर उभ्या असलेल्या अंधानाही पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून अंधाना ताब्यात घेतले. अंध व्यक्ती हे त्यांच्या मागण्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर आले असता त्यांच्यावर बळाचा वापर करून पोलिसांच्या गाडीत घालून पोलिस चौकीत नेण्यात आले. त्यांना ओढून नेताना विव्हळणारे आवाज एकूण उपस्थितांचे मन हेलावून निघाले. दहा ते १२ अंध हे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या मागण्यांसाठी घोषणा देत होते. यावेळी पोलिसांनी या अंधाना अंध म्हणून न पाहता या अंधावर बळाचा वापर केला. पूर्णपणे अंध असलेल्या या मंडळीवर पोलिसांनी केलेला बळाचा वापर पाहिल्यानंतर अंधासोबतही पोलिस अशा पद्धतीने वागले असतील यावर विश्वास बसत नाही.

मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे राज्यातील विविध भागातून लोक मंत्रालयात येत असतात. आपल्या मागण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा अनेकांना असते. अशीच अपेक्षा घेऊन काही अंध मंडळी त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे मंत्रालयाच्या गेटवर येऊन घोषणाबाजी करू लागले.

या अंधानी मंत्रालयाच्या बाहेर नियमबाह्य रित्या घोषणाबाजी केल्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी या अंधानी आम्ही आमच्या मागण्यासाठी येथे आलो आहेत असे सांगत आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करत होते. पोलिसांनी या अंधाना मंत्रालयाच्या गेट वरून जाण्यास सांगितले होते. मात्र या अंधानी आम्ही आमच्या न्याय मागण्या मागत असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत या अंधाना पोलिस गाडीत डांबले.

अंधाना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस चौकीत नेण्यात आले. अंध हे कुठले होते. त्यांच्या मागण्या काय होत्या याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या अंधाची भेट होऊ शकली नाही. पोलिसांनी अंधाना ताब्यात घेऊन सोडून दिल्यानंतर ते अंध कोठे गेले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने या अंधाना वागणून दिली आहे. त्यातून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर काम करणारे पोलिस देखील सुरक्षेच्या प्रचंड तणावाखाली असल्याचे यावेळी जाणवत होते.