मुंबई-मराठा आरक्षणावरून सुरु असलेल्या आंदोलनाच्या दरम्यान सर्वप्रथम आमदारकीचा राजीनामा देणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंत्रालयाच्या समोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. जोवर हे सरकार मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढत नाही. तोवर मी ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा जाधव यांनी सराकारला दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार काहीच करत नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मी राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा राज्यपालांच्या एडीसीसींशी बोललो आणि हे सरकार जर अध्यादेश काढत नसेल तर हे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान दुपारी त्यांना पोलिसांनी अटक करून विधानभवन पोलीस चौकीत घेऊन गेले, तिथून त्यांना सोडण्यात आले. आता औरंगाबादला जाऊन करामती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढे मोठा निर्णय घेणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
