मुंबई । धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी असे आत्महत्याचे प्रयत्न होत आहेत. सांगलीत काल पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. तेथील महिला पोलिसांनी त्यांना तातडीने अडवून ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला, तर 2013 मध्ये दिलेल्या सहायक कृषी अधिकारीपदाच्या परीक्षेत त्याला कमी गुण मिळालेल्या तरुणाने मंत्रालयाबाहेरच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या पेपरची फेरतपासणी करण्याच्या सूचना राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केल्या आहेत, तर गुुरुवारी हर्षल रावते तरुणाने 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे मंत्रालय आता सुसाइड स्पॉट बनले आहे का, अशी टीका विरोधक करू लागले आहेत.
सुसाइड नोटमध्ये काय?
हर्षलच्या पँटच्या खिशात सुसाइड नोट सापडली. कारागृहातील कालावधीबद्दल हर्षल निराश होता. न्याय मिळत नसल्याची त्याची खंत होती. मंत्रालयात येऊन संबंधित विभागातील लोकांना भेटून, न्याय मिळेल, अशी हर्षलला अपेक्षा होती. मात्र, तसे न झाल्याने तो निराश झाला होता, असे हर्षलच्या सुसाइड नोटवरून लक्षात येते आहे.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती
लोक मंत्रालयात येऊन आत्महत्या करत आहेत, याचा अर्थ हे सरकार जनतेला न्याय देऊ शकत नाही. ही गंभीर परिस्थिती आहे. सरकार लोकांना न्याय देऊ शकत नाही. मंत्री सगळे अधिकार आपल्याकडे ठेवत आहेत आणि अधिकारी निर्णय घेत नाहीत. सरकारने वेळीच जागे झाले पाहिजे अन्यथा ही परिस्थिती चिघळू शकते, सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
सरकारने आत्मपरीक्षण करावे!
मंत्रालयात आणखी एक बळी गेला आहे. हर्षल रावतेची हत्या की आत्महत्या, हे चौकशीत सिद्ध होईल. परंतु, मंत्रालय सुसाइड स्पॉट झाले आहे. हे महाराष्ट्रासाठी शोभनीय नाही. नागरिकांनी मंत्रालयात येऊन जीव देण्याची वेळ का येते, याचे सरकारने आत्मपरीक्षण करावे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
आत्महत्या की हत्या पोलीस तपासानंरच स्पष्ट होणार
हा तरुण खुनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता. तो पॅरोलवर सुटीवर होता. पोलीस या घटनेची चौकशी करतील, ही आत्महत्या होती की हत्या, याचा तपास करतील. त्यानंतरच सर्व प्रकरण सुस्पष्ट होईल.
-विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री