मुंबई । मागील आठवड्यात मंत्रालयात झालेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी अतिरीक्त पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यावरील सुरक्षेबरोबरच मंत्रालय परिसरात आलेल्या नागरिकांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या मंत्रालयात पीडित व्यक्तींकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत वाढ होत असल्याने मंत्रालयात अतिरिक्त 75 पोलीस कर्मचारी देण्यात आले असून प्रत्येक मजल्यावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मंत्रालयात अंतर्गत विविध ठिकाणी 432 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामालादेखील वेग देण्यात आला आहे, तर मंत्रालयाच्या पहिल्या मजल्याला समांतर जाळी बसवण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले आहे. नव्या इमारतीमध्ये ही व्यवस्था केली जात असली, तरी जुन्या अनेक्स इमारतीमध्ये मात्र सुरक्षेचे उपाय होताना दिसून येत नाहीयेत. या इमारतीच्या भल्यामोठ्या खिडक्या धोकादायक आहेत.
सुरक्षा उपाय गरजेचे
मंत्रालयात आपल्या कामानिमित्त आलेल्या अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अहमदनगरच्या अविनाश शेटे या युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. उस्मानाबादच्या ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने सातव्या मजल्यावर चढून यंत्रणेला वेठीस धरले होते. धर्मा पाटील या शेतकर्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या शेतकर्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हर्षल रावते या कैद्याने तर मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन सुरक्षा व्यवस्था अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालय सुरक्षेसाठी 175 मंजूर सुरक्षा कर्मचारी असून यापूर्वी रजा, सुट्या वगळता रोज 125 कर्मचारी सुरक्षेसाठी उपलब्ध होतात. अतिरिक्त 75 कर्मचार्यांमुळे मंत्रालय सुरक्षा अधिक सक्षम होणार आहे. सुरक्षा उपाययोजनांच्या दुसर्या टप्प्यामध्ये मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बूम बॅरियर्स आणि बोलार्डस हे अत्याधुनिक फाटक बसवण्यात येणार आहे. यामुळे प्रवेशद्वारातून येणार्या प्रत्येक वाहनाचे स्कॅनिंग करणे शक्य होणार आहे. यामध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर वापरण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ सुरक्षा अधिकार्याने दिली आहे. आधार सलंग्न सुरक्षा व्यवस्थेसाठी खाजगी सल्लागार कंपनीकडून सल्ला घेतला जात असून यासाठी आधार नंबरची जोडणी करण्याचा सल्ला ही कंपनी देऊ शकते असे या अधिकार्याने स्पष्ट केले आहे. मंत्रालयात येणार्या अभ्यागतांना जलद पास वितरित होण्यासाठी ओळखपत्रासाठी नवी अत्याधुनिक व्यवस्था राबवण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्याने दिली.