पिंपरी-चिंचवड/पुणे : हिवाळी अधिवेशन संपताच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे जोरात वाहू लागले असून, एप्रिलमध्ये मंत्रिमंडळ फेरबदल होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. या फेरबदलात काही जुन्या चेहर्यांना डच्चू मिळणार असून, नवीन चेहर्यांना संधी मिळणार असल्याची माहितीही देण्यात आली. शिवसेनेच्या खात्यात काही शिल्लक मंत्रिपदे टाकण्याची खेळी भाजपने रचली असून, तसा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. परवा राजधानी दिल्लीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फेरबदलाबाबत भाजपश्रेष्ठींशीही चर्चा केल्याची माहिती सूत्राने दिली. दरम्यान, हडपसर मतदारसंघात योगेश टिळेकर यांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर गतआठवड्यात झळकले असून, हडपसर की चिंचवड मतदारसंघात मंत्रिपद जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असताना, आ. टिळेकर यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने जोरदार ट्वीस्ट निर्माण झाला आहे. पुण्याला गिरीश बापट यांच्यानिमित्ताने मंत्रिपद असताना, आ. टिळेकर यांच्या रुपाने दुसरे मंत्रिपदही पुण्यालाच मिळणार, की चिंचवडला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून आहे. दुसरीकडे, ना. बापट यांना डच्चू मिळणार असून, आ. जगताप यांना पालकमंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चाही भाजपच्या गोटातून ऐकू होत होती.
काही जुन्यांना डच्चू, ठरावीक नव्यांना संधी!
गत दोन वर्षात अर्धाडझनवेळा मंत्रिमंडळ फेरबदल लांबणीवर टाकल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरबदलास हिरवा कंदील दर्शविला असून, दिल्लीस्थित पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदीलही मिळविला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात काही जुन्या चेहर्यांना डच्चू मिळणार असून, काही ठरावीक नवीन चेहर्यांना संधी देण्यासह प्रादेशिक समतोलदेखील साधला जाणार आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली असल्याची माहितीही भाजपच्या सूत्राने दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे नाथाभाऊंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतात का ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा शिवसेना पक्षप्रमुखांसोबत झाली होती. परंतु, नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागावरून हा मुद्दा भिजत घोंगडे पडला होता. ठाकरे यांनी राणे यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शवित पाठिंबा काढण्याचा इशारा दिला होता. आता राणे यांची अडचण दूर झाली आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेकडील नावेही मागितली असल्याची माहिती भाजपच्या सूत्राने दिली आहे.
आ. टिळेकरांना भावी मंत्री म्हणून शुभेच्छाही सुरु!
पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे दोन्ही शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्या नावावर गतवेळेस शिक्कामोर्तब झाले होते. परंतु, राणेंच्या मंत्रिमंडळातील सहभागाला शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे त्यावेळेस फेरबदल होऊ शकले नव्हते. आता हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनीदेखील मंत्रिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी चालवली असून, हडपसरमध्ये काही भागात त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी भावी मंत्री म्हणून त्यांना शुभेच्छा देणारे फलकही लावले होते. त्यामुळे या फेरबदलात मंत्रिपद हडपसरला मिळणार की चिंचवडला असा प्रश्न निर्माण झालेला आहे. हडपसर मतदारसंघ हा पुणे शहरात येतो. त्यामुळे टिळेकर यांना मंत्रिपद मिळाले तर पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय होणार आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची मोठी गोची झाली आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीचे गणिते पाहाता टिळेकर यांना मंत्रिपदाची संधी देणे भाजपला परवडणारे ठरणार आहे. दुसरीकडे, पालकमंत्री गिरीश बापट यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून, आ. लक्ष्मण जगताप यांनाच मंत्रिपद मिळेल, अशी माहितीही भाजपच्या वरिष्ठस्तरीय गोटातून मिळाली आहे.