मुंबई: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला असताना भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. कोरोनाच्या विळख्यातून मंत्रिमंडळातील नेतेही सुटलेले नाही. सुरुवातीला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे मोठे नेते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याने मंत्रिमंडळात कार्यरत असलेल्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता आता वाढली आहे.
धनंजय मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी रात्री या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल आला. धनंजय मुंडे आज शुक्रवारी रूग्णालयात दाखल होणार आहेत. धनंजय मुंडे दररोज मंत्रालयात जात होते. मंगळवारी झालेल्या बैठकीला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते.
मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, पीए, मुंबईतील वाहन चालक, बीडचे वाहनचालक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुंडे हजर होते. धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले असून ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते.