मुंबई । राज्यात एकीकडे अनेक विद्यार्थी मूलभूत शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या मुलांना मात्र सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ देऊन परदेशात शिक्षण देण्याची तयारी सरकारने केली असल्याचा प्रकार सरकारच्याच शासन निर्णयातून समोर आली आहे. वंचित घटकांना सुविधा देण्यासाठी असलेल्या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीला परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याची धक्कादायक बाब शासन निर्णयामार्फत समोर आली आहे. लाखो रुपये पगार घेणार्या मंत्री आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या मुलांना अशा प्रकारची सुविधा कशी दिली जाते? यावर चर्चा रंगली आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने तयार केली आहे. अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा फायदा होत आहे. याच खात्याचे मंत्री राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. यामुळे खर्या गरजू विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. यात समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावेदेखील आहेत.
माझ्या मुलीच्या निवड प्रक्रियेत मी कुठेही नव्हतो. अशा शिष्यवृत्तीच्या अर्जाबाबत मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. ही शिष्यवृत्तीची यादी घोषित झालेली आहे. आर्थिक लाभ अजून मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढचा निर्णय घेईन.
-राजकुमार बडोले,
सामाजिक न्यायमंत्री
राज्यातील सत्ताधारी मंत्री स्वताच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलांना फायदा देण्यासाठी असे निर्णय घेतात हे चुकीचे आहे. बडोले यांच्या मुलींना शिष्यवृत्तीची गरज काय? सामान्य वर्गातील मुलांनी काय करायचे?
-धनंजय मुंडे,
विरोधी पक्षनेते
ज्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी. बडोले आणि सरकारी वरिष्ठ अधिकार्यांच्या मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळले ही दांभिकता आहे. ही बाब निषेधार्ह आहे.
-सचिन सावंत, प्रवक्ते काँग्रेस
माझ्या मुलाला परदेशी शिक्षणासाठी नियमानुसार शिष्यवृत्ती मिळाली आहे. पहिल्या 100 मध्ये असलेल्या विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाल्याने ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
-दिनेश वाघमारे
सचिव, समाजकल्याण विभाग