मंत्र्याची शिष्टाई निष्फळ, अण्णा आंदोलनावर ठाम!

0

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे, केजरीवालांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही : हजारे
अण्णांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर : महाजन

राळेगणसिद्धी : लोकशाही देशाचा कारभार चारच लोक पाहात असून, देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. जनलोकपाल व शेतकर्‍यांच्या आंदोलनावर आपण ठाम असल्याचे सांगत, थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी गळ घातली होती. परंतु, महाजन यांची शिष्टाई असफल ठरली आहे. तरीही अण्णांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असून, अण्णाही चर्चा करून तोडगा काढण्यास तयार असल्याचे महाजन यांनी सांगितले. महाजन व हजारे यांच्यात तब्बल तासभर बंदद्वार चर्चा झाली होती. काही मागण्या मान्य करण्यात येत असल्याचे पत्रही त्यांना सरकारच्यावतीने देण्यात आले होते. तरीही हजारे हे आंदोलनावर ठाम असल्याचे सूत्राने सांगितले आहे.

अण्णांचा पुन्हा चलो दिल्लीचा नारा!
अण्णा हजारे यांच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर परवानगी मिळाली असून, हजारे यांनी देशवासीयांना चलो दिल्लीचा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र सरकारचे दूत म्हणून हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेतली. यावेळी हजारे यांनी लोकशाही देशाचा कारभार चारच जण पाहात असल्याचा आरोप केला. तसेच, हा देश हुकूमशाहीकडे कसा वाटचाल करत आहे हे आंदोलनात सांगणार असल्याचे सांगितले. या अधिवेशनात कोणती विधेयके मांडणार ते अगोदर सांगा, असेही हजारे यांनी मंत्री महाजन यांना बजावले. वेळ कमी पडत असेल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवा, असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला. आता केवळ चर्चा नाही तर ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 43 पत्रे लिहिली. परंतु, पत्रांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधानांना सवड नसेल किंवा ईगो आडवा येत असेल, असा टोलाही हजारे यांनी लगाविला. अण्णांच्या या इशार्‍यानंतर रामलीला मैदानावर होत असलेल्या मोदी सरकारविरोधी आंदोलनावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

महाजन यांनी दिले अण्णांना तीनपानी पत्र
दरम्यान, गिरीश महाजन यांनी सांगितले, की अण्णा हजारे हे चर्चा करून तोडगा काढण्यास सकारात्मक आहे. स्वतः मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री याप्रश्नी चर्चा करतील व तोडगा काढतील. अजून लोकसभेचे अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे. अण्णांची प्रमुख मागणी ही लोकपाल विधेयक मंजूर करा, हीच आहे. गेले तीनही अर्थसंकल्प शेती, शेतकरी केंद्रीत होते ही बाब आम्ही अण्णांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर आहे. राजधानी दिल्लीत 23 मार्चपासून अण्णांचे आंदोलन सुरु होत असून, राजकीय दूत म्हणून आपण अण्णांशी चर्चा केली, असेही महाजन यांनी सांगितले. केंद्र सरकारच्यावतीने तीन पानी पत्र घेऊन महाजन हे राळेगणसिद्धीत गेले होते. लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर हे आंदोलन असल्याचे हजारे यांनी महाजन यांना सांगितले आहे. तसेच, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. नुसते सरकार बदलून फायदा नाही तर व्यवस्था परिवर्तन झाले पाहिजे तरच परिस्थिती बदलेल. शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही, असेही अण्णांनी महाजन यांना या भेटीत ठणकावले होते.

अहंकारी सरकारने लोकांचा विश्वास गमाविला
न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीला अण्णांनी या आंदोलनाबाबत सविस्तर मुलाखत दिली असून, या मुलाखतीत आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे होत असून, ती धोक्याची घंटा आहे. अहंकारी केंद्र सरकारने लोकांचा विश्वास गमाविला आहे, अशी घणाघाती टीकाही अण्णा हजारे यांनी या मुलाखतीत केली आहे. तसेच, या आंदोलनात अरविंद केजरीवाल यांना आंदोलनाची पायरीही चढू देणार नाही, असेही त्यांनी नीक्षून सांगितले. अण्णा म्हणाले, पंतप्रधानांना 43 पत्रे लिहिली मात्र एकाही पत्राचे उत्तर पंतप्रधानांकडून आले नाही. चार वर्षे झाली मी लोकपाल आणि लोकायुक्तांच्या मागणीसाठी आवाज उठवतो मात्र त्याकडे हे सरकार लक्षच देत नाही. काँग्रेस सत्तेवर असताना भाजपवाल्यांनीच लोकपालला पाठिंबा दिला होता. परंतु, या सरकारनेच लोकपाल, लोकायुक्त विधेयक कमकुवत केले. अनेक विधेयकांवर चर्चा न होता ते मंजूर केले गेले हे कशाचे लक्षण आहे, असा सवालही हजारे यांनी केला.