मंदिरांच्या ट्रस्टमध्ये महिलांना 50 टक्के स्थान द्यावे

0

तृप्ती देसाई : इंद्रेश्‍वर देवस्थान प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला हजेरी

इंदापूर । राज्यातील अनेक ट्रस्टमध्ये महिलांना स्थान नाही. आमच्या आंदोलनानंतर शिर्डी, शनि शिंगणापुरच्या ट्रस्टवर महिला आल्या. राज्यातल्या सगळ्या ट्रस्टवर महिलांना 50 टक्के स्थान देण्याची मागणी भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदापूरात पत्रकारांशी बोलताना केली. जागतीक महिला दिनानिमित्त आयोजित जागतीक महिला रॅलीसाठी लातूरला जात असताना त्यांनी इंदापूरला भेट दिली. इंदापूर देवस्थान ट्रस्टींच्या निमंत्रणावरून त्यांनी इंद्रेश्‍वर देवस्थान प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दारुमुक्त महाराष्ट्र आंदोलन
महिलांना आता सर्वच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. महिला पुजार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी यावेळी केली. स्त्री भ्रूण हत्येविरोधात आमचा लढा चालू असून सर्वत्र समानता यावी यासाठी हुंडाविरोधी आंदोलन, महिलांवरील अत्याचारांवर आवाज उठविण्यात येत आहे. दारुमुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महिलांना समान न्याय
मराठवाडा, खानदेश, विदर्भात तर महिला रात्री 8 वाजल्यानंतर घरातून बाहेर देखिल पडू शकत नाहीत. त्यामुळेच यावेळी मी मराठवाड्याची निवड केली आहे. मागील वेळेस दारुबंदी आंदोलनासाठी इंदापुरात येऊन गेले होते. महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलने केली. त्याला यश मिळाले आहे. त्याचा प्रत्यय आज इंद्रेश्‍वर मंदिरात पाहायला मिळाला. सर्व समान न्यायाने या मंदीरात महीलांनाही सारखीच वागणूक मिळत आहे, असे तृप्ती देसाई यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक गावात तृप्ती देसाई निर्माण व्हावी

राज्यभर भुमाता ब्रिगेडची भक्कम बांधणी सुरू आहे. केरळ, पंजाब, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात आम्हाला बोलाविले जात असून तृप्ती देसाईच सर्वत्र पोहचावी असे नाही तर प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात तृप्ती देसाई निर्माण व्हावी, असे मत तृप्ती देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी इंद्रेश्‍वर ट्रस्टच्या वतीने तृप्ती देसाई यांचा सत्कार करण्यात आला.