मंदिरे उघडल्याने सरकारला वाईट का वाटते: फडणवीस यांचा सवाल

0

औरंगाबाद: काल रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना वाढतो आहे, ‘मंदिरे उघडा हे उघडा ते उघडा’ म्हणणाऱ्यांची राज्यातील जनता स्वस्थराहावे ही जबाबदारी नाही का ? असा सवाल केला होता. यावर आज सोमवारी माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केल्याचा सरकारला इतका राग का?, मंदिरे उघडल्याने सरकारला वाईट का वाटते? असा सवाल उपस्थित केला आहे. बार उघडले, थिएटर उघडले, सर्व काही सुरु आहे, याने कोरोना वाढणार नाही का?, फक्त मंदिरे उघडल्यानेच कोरोना वाढणार आहे का? असाही सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी औरंगाबाद येथे फडणवीस आले होते, त्यावेळी ते बोलत होते. युतीसरकारच्या काळात मराठवाडा विकासाच्या मुद्द्यावर अग्रस्थानी होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यावर अन्याय होत आहे. विकास कामांकडे दुर्लक्ष केले आहे. मराठवाड्याच्या विकासकामांना स्थगिती देण्यापेक्षा या सरकारने काहीही दिले नाही असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.