मंदिरे पाडणार्‍यांना विरोध करा; नरेंद्र परदेशींचे आवाहन

0

धुळे । शहरातील पांझरा नदीकिनारी असलेले तब्बल पावणे दोनशे वर्षापुर्वीचे आणि तितकेच जागृत असलेले पंचमुखी हनुमान मंदिर तसेच माता महाकाली मंदिर शेवटच्या घटका मोजत आहे. ही मंदिरे लवकरच भुईसपाट होणार असून हिंदूंनो आता तरी एकत्र या. विकासाच्या नावाखाली हिंदूंचे मंदिरे पाडणार्‍यांना विरोध करा. एक-एक मंदिर गिळंकृत करणार्‍या बेभान आणि बेफाम बकासुराला थोपवा असे व्याकुळ आवाहन शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मंदिरे शेवटच्या घटकेवर..
संकटमोचन असलेल्या पंचमुखी हनुमानासह माता महाकालीचे मंदिर शेवटच्या घटका मोजत आहे. या मंदिरांच्या मृत्यूची तारीख 11 ते 14 मे दरम्यान ठरली आहे. त्यामुळे या मरणासन्न स्थितीतून आम्हाला कोण वाचवेल असे म्हणत ही मंदिरे भक्तांकडे आशाळभुत नजनेने पहात आहे. संकटकाळी मंदिरात आलेल्या भक्तांच्या ओंजळीत आशिर्वादाची ताकद उभी करणार्‍या, भक्तांचे दुःख दूर करणार्‍या या देवताच आज भक्तांच्या दारी उभ्या आहेत. कारण अनिल गोटे नावाचा यम त्यांच्या दारावर येवून ठेपला आहे.

आमदारांना असुरी आनंद
देवस्थाने पाडून अनिल गोटेला असुरी आनंद मिळत आहे. नव्हे ती त्याची विकृतीच बनली आहे. हिंदूंची मंदिरे, बौद्धांची तत्वज्ञान मंदिरे, मुस्लिमांचे दर्गे पाडून माझे कुणीच काही करु शकत नाही असा अहंकार डोक्यात भिनल्याने शहराची नासधुस सुरु आहे. प्रार्थना स्थळांची मोडतोड करुन, दंगली माजवून बदल्याच्या भावनेने वेगळे वळण देण्याचा हा प्रयत्न आहे.

सत्तेच्या नशेत विकासाचा बागुलबुवा
ही मंदीरे शहराची ओळख आणि अस्मिता आहे. खासदार चंद्रकांत खैरेंसारखे बाहेरगावाहून आलेले भक्त देखील या ठिकाणी नतमस्तक होतात. सत्तेच्या नशेत बेधुंद होवून विकासाचा केवळ बागुलबुवा उभार करुन 60 कोटी रुपयांच्या रस्ते कामात 10 टक्के दलाली शिवाय दिवट्या चिरंजीवाला पार्टनशिप घेवून काम करणार्‍या अनिल गोटेंचे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे कालचक्र निरंतन फिरण्यासाठी अक्षरशः निधी पात्रात रस्ते होत आहेत.

अधिकार्‍यांनी राजकीय दबावाला बळी पडू नये
कायद्याचा मुडदा पडत असतांना जिल्हा प्रशासनाने ध्रुतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. मुजोर लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बटीक बनलेल्या प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी आता जनतेलाच बंड पुकारावे लागणार आहे. मात्र हिंदूंमध्ये हे बळ शिल्लक आहे काय? हा खरा प्रश्‍न आहे. कारण 11 नव्हे तर त्याच्या तिप्पट मंदिरे पाडल्याचे आमदार खोटे सांगतात. त्यांना थोपविण्याऐवजी तथाकथीत हिंदू संघटना या भाजपाच्या बटीक बनल्या आहे. आमदाराच्या राजकीय दबावाला बळी न पडणार्‍या प्रामाणिक अधिकार्‍याच्या प्रतिक्षेत धुळेकर आहे. तमाम हिंदू संघटनांनी देखील एकत्र येवून प्रचंड मोर्चा काढला पाहीजे. भाजपप्रणित हिंदू संघटनांनाही स्वत्व आणि स्वाभिमान दाखवून देण्याची ही संधी आहे. तोंड देखला विरोध न करता रस्त्यावर या. लोकप्रतिनिधींनी देखील जनभावनेचा आदर करीत प्रशासनाला आदेश देवून मंदिरांवरील कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला पाहीजे. तरच ही मंदिरे वाचतील. असे पत्रक नरेंद्र परदेशींसह विजय भट्टड, मिलींद मुंदडा, विनोद जगताप आदींनी काढले आहे.