धुळे । शासनातर्फे सुरु असलेल्या मका खरेदी प्रक्रियेत प्रति हेक्टरी लादलेली मर्यादा वाढविणेबाबत प्रभारी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना आ. कुणाल पाटील यांनी निवेदन दिले. राज्य शासनाने जिल्ह्यात मका खरेदी सुरु केलेली आहे. यासाठी मका विक्री करु इच्छिणार्या शेतकर्याने ऑनलाईन नोंदणी करुन ठरुन दिलेल्या दिवशी मका खरेदी केंद्रावर घेऊन जायचा आहे. सोबत 7/12 उतारा घेऊन जायचा असून शासनाकडून प्रति हेक्टरी फक्त 24 क्विंटल हे प्रमाण मानून त्यापेक्षा जास्त असलेला मका खरेदी केंद्रावरुन शेतकर्यांना परत घेवून जावा लागतो. वास्तविक जिराईत शेतीत प्रति हेक्टरी 35 ते 40 क्विंटल आणि बागाईत शेतीत प्रति हेक्टरी 55 ते 65 क्विंटल मक्याचे उत्पादन होते. मका विक्रीसाठी आणला तर हेक्टरी 24 क्विंटल हे प्रमाण मानून त्यांच्याकडील 7/ 12 उतार्यावरील जमिनीच्या श्रेयानुसार उर्वरित मका खरेदी केला जात नाही. बोरविहीर येथील खरेदी केंद्रावरुन न केलेला मका पुन्हा घरी घेऊन जावा लागत असल्याने वाहतूक खर्च वाढत असल्याचे म्हटले आहे.
शेतकर्यांकडून पैशाची मागणी
प्रति हेक्टरी 24 क्विंटल उत्पादनाची मर्यादा वाढवून ती सरसकट 50 क्विंटल करण्यात यावी व यासंबंधीचा अहवाल तातडीने शासनाला सादर करावा. मका खरेदीसाठी एजन्सी म्हणून धुळे तालुका खरेदी विक्री सहकारी संघ लि. या संस्थेची नियुक्ती केली असून बोरविहिर येथे वैभव पशूखाद्य गोडावून येथे सुरु आहे. याठिकाणी तालुका पुरवठा विभागाचे प्रतिनिधी म्हणून मगन रामोळे यांची नियुक्ती केली असुन त्यांनी मनमानी कारभार चालविला आहे. शेतकर्यांकडूक पैशाची मागणी करणे, रोज संध्याकाळी खरेदी केलेला मान ताब्यात न घेणे अशा प्रकारचा त्यांचा कारभार सुरु असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आ.पाटील यांनी केली. यावेळी मधुकर गर्दे, लहू पाटील, वसंत पाटील, रितेश पाटील, दिनेश भदाणे, भगवान पाटील, गवळे देवका, संतोष राजपूत, प्रमोद भदाणे, हर्षल साळुंखे, प्रदीप हालोर, सुपडू गर्दे, वाल्मीक वाघ, बाजीराव नाना, एन. डी. पाटील आदी उपस्थित होते.