मक्याच्या कणसाच्या पिशव्यांमधून होतेय रक्तचंदनाची तस्करी

0

मुंबई । गेल्या काही वर्षांत उरण जेएनपीटी परिसरात रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागांतून जेएनपीटी बंदरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीमुळे हे बंदर आता संघटित रक्तचंदन माफियांच्या विळख्यात सापडले आहे. नुकतीच महसूल गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईत दोन कंटेनरमधून 7.120 मेट्रिक टन रक्तचंदन हस्तगत केले आहे. विशेष म्हणजे, मक्याच्या कणसाच्या पिशव्यांमधून या रक्तचंदनाची तस्करी केली जात होती.

तब्बल 2 कोटी 85 लाख रुपयांचे होते रक्तचंदन
या रक्तचंदनाची किंमत तब्बल 2.85 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांनी दुबईत मक्याची कणसे निर्यात करत असल्याचे भासवून ही तस्करी केल्याचे समोर आले आहे. पश्‍चिम उपनगरात राहणार्‍या या चारही आरोपींना यापूर्वी डीआरआयने सिगारेट तस्करीप्रकरणी अटक केली होती. सुजत बापू साटम, गयाप्रसाद चौधरी, कमलेश घोगले आणि रोहन अवसारे अशी या आरोपींची नावे आहेत. साटम हा या टोळीचा मुख्य आरोपी असून गयाप्रसाद चौधरीने ही रक्तचंदनाची लाकडं मनोरी ते न्हावा शेवापर्यंत आणल्याचे तपासात पुढे आले आहे.

दुबईला पाठवणार होती रक्तचंदनाची लाकडं
दुबईला मक्याची कणसं पाठवण्याच्या नावाखाली या आरोपींनी मक्याच्या कणसाच्या गोणीत ही रक्तचंदनाची लाकडे लपवली होती. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधून ही रक्तचंदनाची लाकडे अनधिकृतरीत्या तोडून आणली होती. सेंट्रल विभागाने हा कंटेनर तपासला होता. त्यात मक्याची कणसं पाहिल्यानंतर त्या कंटेनरला सीलही ठोकले होते. मात्र, आरोपींनी हे सील तोडून त्यामधील मक्याची कणसं काढून रक्तचंदनाची लाकडे भरली. सील तोडल्याचे लक्षात आल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. यापूर्वी या तस्करीचा मास्टरमाईंड सुजत साटमला पोलिसांनी रक्तचंदन तस्करीप्रकरणी 2006 मध्ये आणि सिगारेट तस्करीप्रकरणी 2001 मध्ये अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीतून इतर तस्करीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता डीआरआयच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.