नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी असभ्य वक्तव्य केले. मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?, असा प्रश्न अय्यर यांनी विचारला.
मणिशंकर अय्यर यांच्या या वक्तव्याची दखल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतली असून त्यांनी मणिशंकर यांना सुनावले आहे. राहुल यांनी म्हटले आहे की, भाजप आणि पंतप्रधान काँग्रेसवर हल्ला करताना नेहमीच गलिच्छ भाषा वापरतात. मात्र काँग्रेस हा वेगळी परंपरा आणि संस्कृती असलेला पक्ष आहे. म्हणूनच मणिशंकर यांनी पंतप्रधानांविषयी बोलताना जी भाषा वापरली ती कोणत्याही स्थितीत खपवून घेतली जाणार नाही. याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी माझी आणि पक्षाचीही अपेक्षा आहेे. यानंतर मणिशंकर यांनी माघार घेतली असून नीच म्हणजे मला खालच्या दर्जाचा म्हणायचे होते. दरम्यान, काँग्रेसने रात्री उशीरा अय्यर यांची काँग्रेस
पक्षातून हकालपट्टी केली.
या अपमानाचे उत्तर मतदार देतील
मी खालच्या जातीचा असेन पण माझी कामे उत्तुंग आहेत. ‘उच्च-नीच’ संस्कार आमच्यावर नाहीत. तुमचे संस्कार तुम्हालाच लखलाभ. चांगल्या शैक्षणिक संस्थेत शिकलेला माजी केंद्रीय मंत्री जर मोदीला ‘नीच’ म्हणत असेल तर ही बाब अपमानास्पद तसेच खेदजनकही आहे. या अपमानाचे उत्तर काँग्रेसला जनताच मतदानातून देईल. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान