डॉ.नि.तु.पाटील यांचा स्तुत्य उपक्रम ः वासुदेव नेत्रालय राबवणार मतदार जनजागृती अभियान
भुसावळ- मुक्ताईनगर नगर पंचायतीसाठी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्ररोग तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि अॅड.डॉ.नितु पाटील यांनी मतदार जनजागृती अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना आठवडाभर नेत्र तपासणीत 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. 15 जुलैला मतदान केल्यानंतर हे अभियान 15 ते 22 जुलै वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयात चालणार आहे. या आधीही डॉ.पाटील दाम्पत्याने विधानसभा, जिल्हा परीषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत असा उपक्रम राबवून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला होता.
बोटावरील शाही दाखवल्यानंतर मिळणार सवलत
लोकशाहीच्या बळकटीसाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. शासन, प्रशासन, सेवाभावी सामाजिक संस्था यासाठी जनजागृती करत आहे. यास आपलाही हातभार लावावा या उदात्त हेतून डॉ.पाटील दाम्पत्याने हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास या सवलतीचा फायदा घेता येणार आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील मतदारांना याचा फायदा होणार आहे.
सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक -डॉ.नि.तु.पाटील
प्रत्येक नागरीकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य रविवार, 15 जुलै रोजी राबवावे. मतदाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून 15 ते 22 जुलै या काळात मतदारांना नेत्र तपासणी शुल्कात 50 टक्के सूट मिळणार आहे. आपली सामाजिक बांधीलकी जोपासत सशक्त लोकशाहीसाठी मतदान करणे आवश्यक आहे, असे डॉ.नि.तु.पाटील म्हणाले.