मुक्ताईनगर निवडणुकीचा आखाडा रंगतोय आरोप-प्रत्यारोपांनी
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा रंगण्यास सुरूवात झाली असून हा आखाडा आरोप-प्रत्यारोपांनी चांगलाच रंगत आहे तर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी मतदान केंद्रात बदल केल्याने मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील मतदानासाठी प्रभाग क्रमांक सहा/एक व सहा/दोन ही मतदान केंद्र गोदावरी मंगल कार्यालयात निश्चित करण्यात आले होते मात्र मतदानाच्या दिवशी मंगल कार्यालयात लग्न समारंभ असल्याने हे मतदान केंद्र खडसे महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळील खोलीत हलविण्यात आल्याने उमेदवार व मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच प्रभाग क्रमांक एक व दोन हे दोन्ही मतदारसंघ जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत निश्चित करण्यात आले होते मात्र या खोल्यांना पावसामुळेे गळती लागत असल्याचे कारण पुढे करीत या मतदान केंद्रातही बदल करून नवीन मतदान केंद्र जिल्हा परीषद उच्च प्राथमिक कन्या शाळा या ठिकाणी करण्यात आला असल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुखांची तक्रार
मतदान केंद्र बदलाला प्रभाग क्रमांक सहाचे शिवसेनेचे उमेदवार प्रशांत भालशंकर यांनी आक्षेप घेतला असून खडसे महाविद्यालय हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यालय असल्याने या ठिकाणी निपक्ष मतदान पद्धत पार पडू शकत नाही, असा आरोप केला आहे तर या बाबतीत शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात 7 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
आरोप-प्रत्यारोपांचा आखाड्याची रंगत
नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होत आहे. यामुळे शहरातील पाणी समस्या, अस्वच्छता व विविध समस्या आणि विकासाच्या कामावर आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाड्याची रंगत चांगलीच रंगू लागली आहे.