काँग्रेससाठी ऐनवेळची उमेदवारी ठरली घातक ; काँग्रेस-राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव
भुसावळ (गणेश वाघ)- रावेर लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रक्षा खडसे या तब्बल तीन लाख 31 हजार 856 मतांनी विजयी झाल्या तर त्यांनी गतवेळचा सर्वाधिक लीडचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. खासदारांनी मतदारांनी संघात केलेली प्रचंड विकासकामे, मतदारसंघातील गावापर्यंत वैयक्तिक असलेला जनसंपर्क तर अत्यंत दूरदृष्टीने केलेले बुथनिहाय नियोजन या बाबीही विजयासाठी पोषक ठरल्या तर प्रतिस्पर्धी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांना फार्म भरण्याच्या अखेरच्या तीन दिवस आधी मिळालेली उमेदवारी तर मतदारापर्यंत न झालेला संपर्क व काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुही यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, 1977 नंतर रावेर मतदारसंघातून सलग 13 वेळा लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवाराला येथे संधी मिळाल्याने हादेखील यानिमित्ताने इतिहास रचला गेला आहे.
रावेर मतदारसंघात 13 वेळा लेवा समाजाच्या उमेदवाराला संधी
1951 मध्ये बॉम्बे प्रांतातील स्वतंत्र भुसावळ मतदार संघातून इंडियन नॅशनल काँग्रेसतर्फे शिवराम रांगो राणे तर जळगाव मतदार संघातून हरी विनायक पाटसर निवडून आले होते. 1957 मध्ये नौसीर भरुचा यांना तर 1962 मध्ये महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यानंतर लागलेल्या निवडणुकीत बाळद, ता.पाचोरा येथील रहिवासी तथा जेडीसीसी बँकेचे संस्थापक अध्यक्ष जुलालसिंग शंकरराव पाटील यांना संधी मिळाली होती. 1967 मध्ये एस. एस. सईद यांच्या माध्यमातून मुस्लिम तर 1971 मध्ये पाचोर्याचे कृष्णराव माधवराव पाटील या मराठा समाजाच्या प्रतिनिधीला काँग्रेसकडून संधी मिळाली. 1977 पासून मात्र यशवंत मन्साराम बोरोले यांच्यापासून थेट 2014 पर्यंतच्या रक्षा निखिल खडसे यांच्यापर्यंतच्या सर्व 12 उमेवार लेवा पाटीदार समाजाचे आहेत. 2009 च्या निवडणुकीत मराठा समाज मोठा असतानाही रावेर मतदार संघाच्या पूर्नरचनेनंतरही लेवा पाटीदार समाजाची पकड या मतदार संघावर कायम राहिली. या काळात 1980, 1984 व 1989 मध्ये झालेल्या तिन्ही निवडणूकीत यादव शिवराम महाजन अर्थात वाय. एस. महाजन यांना हॅट्रीकची संधी मिळाली. 1980 मध्ये ते इंडियन नॅशनल काँग्रेस (आय) तर इतर दोन्ही वेळेत इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उमेदवार होते तर 2014 व 2019 मध्ये खासदार रक्षा खडसे यांना लेवा समाज उमेदवार म्हणून दुसर्यांदा संधी मिळाली. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीत आठ महिलांनी निवडणूक लढवली असलीतरी केवळ रक्षा खडसेंनाच मतदारांना कौल दिला हेदेखील विशेष !
विकासकामांना मतदारांनी दिला कौल
खासदार खडसे यांनी पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात रेल्वे पुलांसह विविध विकासकामांना दिलेली चालना तसेच रेल्वे अॅप्रेटीसधारकांचा प्रश्न तसेच भुसावळ जंक्शनच्या कायापालटासह विविध स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबे मिळण्यासाठी केलेले प्रयत्न व मतदारसंघातील स्थानकांचा विकास यामुळे मतदारांना खासदार खडसेंना विजयाचा कौल दिला. भुसावळातील घराणेशाही, रेल्वे अतिक्रमणाचा प्रश्न, केळी तसेच नोटबंदी, बेरोजगारी, महामाई हे मुद्दे निष्प्रभ ठरवत मतदारांनी मात्र विकासाच्या पारड्यात मत टाकले. मध्यंतरी झालेले सर्जिकल स्ट्राईक, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा, सुप्त हिंदुत्ववाद या बाबींकडेही मतदारांनी गांभीर्याने पाहत मोदींच्या विचारधारेवरही विश्वास दर्शवला.
बड्या नेत्यांच्या सभाही ठरल्या लक्षवेधी
खासदार खडसेंच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भुसावळात सभा झाली तर नांदुर्यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण या बड्या नेत्यांच्या निवडणूक काळात सभा झाल्या. बहिणाबाई महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली व त्याचवेळी त्यांनी खासदारांच्या कामांचे कौतुक केल्याने एक प्रकारे विजयाचे आशीर्वाद मिळाले असल्याचे बोलले जात होते व ती बाब आता निवडणूक निकालाने खरीदेखील ठरवली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा यांच्यासह खडसे यांच्यासाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची होती मात्र प्रकृती अस्वास्थामुळे खडसे निवडणूक रींगणात उतरले नसलेतरी त्यांच्या नेतृत्वावरदेखील मतदारांनी ईव्हीएमद्वारे विश्वास दाखवून दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज
रावेर लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल? यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत अखेरच्या क्षणापर्यंत संभ्रम राहिल्याने मतदारांसाठीदेखील ही बाब आश्चर्यकारक ठरली. आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादीला जागा करीत ऐन शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तीन दिवस आधी काँग्रेसकडे जागा आल्यानंतर डॉ.उल्हास पाटील यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. तत्पूर्वी रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अॅड.रवींद्र भैय्या पाटील यांचीही चाचपणी झाली तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील अंतिम उमेदवार असतील, असे चित्र निर्माण करण्यात आले मात्र अखेरच्या क्षणी त्यांनीदेखील आपण उमेदवार नसल्याचे सांगून निवडणुकीची हवाच काढली. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ अशोक चव्हाण वगळता एकाही बड्या नेत्याची सभा झाली नाही तर राहुल गांधी यांची सभा दोन वेळा रद्द करण्यात आल्याने त्याचादेखील फटका डॉ.पाटील यांना बसला. काँग्रेस उमेदवारासोबत सुरूवातीच्या सभा वगळता नंतरच्या सभांना वा प्रचाराला राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते फिरताना आढळून न आल्याने गटबाजीलादेखील मोठा फटका उमेदवाराला बसला. मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य पालिका, पंचायत समिती वा ग्रामपंचायतीवर नाही तसेच पक्ष संघटनही नसल्याने त्यामुळे मताधिक्य घटल्याचे बोलले जात आहे. किमान पदाधिकार्यांनी आतातरी आत्मचिंतन करावे, असा सूर उमटत आहे.