सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सूचना : शासनाने काढले आदेश
पुणे : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार जागृती करण्यासाठी महाविद्यालयात येत्या 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत ’लोकशाही पंधरवडा’ साजरा करावा, अशा सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
भारतीय संविधानातील 73 व 74 व्या घटनादुरुस्तीस 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडून ’लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर ऑक्टोबरमध्ये आंतराष्ट्रीय परिषदही घेण्यात आली होती. या परिषदेत मान्यवरांनी मतदारांना मतदार जागृतीसाठी लोकशाहीचे निरंतर शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही करण्यात आले होते. त्यानुसार लोकशाही पंधरवडा साजरा करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आलेले आहेत.
जनजागृती करणे बंधनकारक
महाविद्यालयांमध्ये प्रती वर्षी मतदार नोंदणी मोहिमेच्या वेळी मतदार नोंदणी करणार्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकार्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करणे, नवीन विद्यार्थी मतदारांची नावे यादीत समाविष्ट करणे, विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांचे मुख्य प्रवेशद्वार, सीमाभिंती व रेल्वे, पादचारी पूल या ठिकाणी आकर्षक सचित्र संदेश रंगविणे, 26 जानेवारीसह इतर प्रमुख दिवशी वक्त्यांच्या भाषणातून जनजागृती करणे करणे बंधणकारक करण्यात आलेले आहेत.
विविध कार्यक्रम राबवा
विविध विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर ’जागरूक मतदार लोकशाहीचा आधार’ हा विषय आधार मानून लोकजागृती करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. विविध कार्यक्रम राबविण्याबाबत महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालक यांना विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.
अहवाल पाठविण्याचे आवाहन
नियोजनबद्धरितीने कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच या विविध कार्यक्रमासाठीचा खर्च हा नियमीत कार्यक्रमांच्या तरतुदीतून करण्यात यावा. महाविद्यालयांनी लोकशाही पंधरवडा साजरा केल्याबाबतचे अहवाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 12 फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत, असे आवाहनही देसाई यांनी महाविद्यालयांना केलेले आहे. विद्यार्थी विकास अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठातील विविध विभागातील इतर प्राध्यापकांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेऊन त्यांच्याकडेही जबाबदारी वाटप करून देण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.