मदतीसाठी धावून आलेल्या पोलिसालाच जळगावात मारहाण : दोघा भावंडाविरोधात गुन्हा

Jalgaon city police station employee’s Earplug : Crime Against Both जळगाव : जळगाव शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍याशी हुज्जत घालून त्यांच्या कानशीलात लगावणार्‍या दोघा भावंडांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आतीष दिनेश बारसे (27) व अमित दिनेश बारसे (30, दोन्ही रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

पोलिस कर्मचार्‍यावर उचलला हात
जळगाव शहरचे कर्मचारी बापूराव पिरा मोरे सोमवारख 29 ऑगस्ट रोजी आरटीपीसी ऑनड्यूटी असतांना त्यांना 112 क्रमांकावरून कॉल आला. त्यानुसार बापूराव मोरे व सहकारी अय्युब पठाण हे शासकीय वाहनाने नवीन बी.जे. मार्केटमधील कौटूंबिक न्यायालयात गेले. त्यावेळी कॉल करण्याचे कारण विचारले असता कॉल करणारे राजेश पाटील त्यांची भाची गायत्री मच्छींद्र पाटील, रवींद्र भिका पाटील, बहिण दीपाली मच्छींद्र पाटील (सर्व रा.विखरण, ता.एरंडोल) हे उभे होते. गायत्री हिचा न्यायालयात पती आतिष दिनेश बारसे याच्यासोबत घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे चिडून आतिष हा बहिण दीपाली हिच्या अंगावर धावून आला तर चुलत मेहुणे रवींद्र पाटील यांना मारहाण केल्याचे राजेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यावर मोरे यांनी तुम्हाला पोलिसात तक्रार द्यायची आहे का? नसेल तर खाली सोडतो असे सांगितले. आतिष बारसे याने पोलीसात तक्रार द्यायची तयारी दर्शविल्याने या सर्वांना पोलीस वाहनात बसविले.

जाब विचारताच केली मारहाण
यावेळी आतिष बारसे याने उजव्या बाजुचा दरवाजा जोरात उघडून गायत्री पाटील हिला हात धरुन बाहेर ओढले. त्यावर बापूराव मोरे यांनी सरकारी वाहनाचा दरवाजा का उघडला?, असा जाब विचारला. यानंतर आतिष बारसे याने पोलिस कर्मचारी मोरे यांच्या कानशिलात लगावली. त्याचा भाऊ अमित याने देखील या पोलिसांशी धक्काबुक्की केली.

जिल्हापेठ पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
यावेळी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना मदतीसाठी बोलावून घेण्यात आले. याप्रकरणी बापूराव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आतीष दिनेश बारसे (27) व अमित दिनेश बारसे (30) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.