पुणे : मदरशात शिक्षण घेणाऱ्या दोन मुलांवर मौलानाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मौलानाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालहक्कांविषयी काम करणाऱ्या कार्यकर्त्यां महिलेने या प्रकाराला वाचा फोडली. मौलाना रहीम याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. यामिनी बडवे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. कात्रज भागात जामिया अरबिया मदरसा आहे. या मदरशातील दोन मुले पुणे रेल्वे स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होती. साथी संस्थेच्या डॉ. बडवे यांनी या मुलांकडे विचारपूस केली, तेव्हा त्यांच्याकडे मदरशाचे ओळखपत्र आढळून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात आली. तेव्हा, पंधरा दिवसांपूर्वी मदरशातून पळून आलो. मदरशातील मौलाना रहीम याच्याकडून सुरू असलेल्या लैंगिक अत्याचारांना घाबरून पळून आल्याची माहिती मुलांनी चौकशीत दिली.
मौलानाच्या अत्याचारांना विरोध करणाऱ्या मुलांना तो काठीने मारहाण करत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर डॉ. बडवे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक टिळेकर तपास करत आहेत. दरम्यान, मदरसा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने कोंढवा पोलिसांकडून हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे तपासासाठी सोपविला गेला.