मद्यपी युवकांचा झुणका भाकर केंद्रात गोंधळ

0

जळगाव। दारूच्या नशेतील तीन धुंद युवकांनी नवीन बसस्थानकाजवळील झुणका भाकर केंद्रात गोंधळ घालून घबराहट निर्माण केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. समजविण्याचा प्रयत्न करूनदेखील काही एक उपयोग होत नसल्याचे दिसू लागल्यानंतर दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महेश राजेंद्र तायडे (22) अमोल अशोक सपकाळे (18) व डिंगबर रविंद्र सोनवणे असे तीन युवक नाश्ता करण्यासाठी बस स्टॅन्डजवळील झुणका भाकर केंद्रात दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास आले होते.

पोलिसांनी मद्यपी युवकांना घेतले ताब्यात
दरम्यान नशेतील दोघांनी नाश्ता करत असलेल्या एका ग्राहकाकडे नजर टाकत शिवीगाळ केली. दरम्यान एस.टी.चालक गोपाळ पाटील हेही नाश्ता करत होते. त्यांनादेखील युवकांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. मद्यधुंद युवक ग्राहकांनाच त्रास देत असल्याचे वास्तव अनेकांनी अनुभवले, परंतु वादात काय पडायचे अशी भूमिका काहींनी घेतली. युवकांचा आवाज वाढत असल्याचे दिसू लागल्यावर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन युवकांना ताब्यात घेत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणले. मात्र, या घटनेमुळे झुणका भाकर केंद्र परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमची होती. यानंतर या युवकांच्या विरोधात एसटी कर्मचारी गोपाळ पाटील यांनी अर्ज दिल्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पूढील तपास पुरषोत्तम वाघळे व फिरोज तडवी हे करीत आहेत.