जळगाव। शिवाजी पुतळ्याकडून नवीन बसस्थानकाकडे येत असलेल्या बसला रिक्षा चालकाने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. दारूच्या नशेत भरधाव वेगात रिक्षा पळविणार्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. नंतर याठिकाणी गर्दी झाली. तर रिक्षाचालकाने ताब्यातील वाहनासह पलायन केले. दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास असोदा भादली ही एस.टी. बस जळगाव बसस्थानकाकडे येत होती. पोलीस अधीक्षक गेट समोर गाडी आल्यावर भरधाव वेगात वळण घेणार्या चालकाची रिक्षा बसवर धडकली. दरम्यान बस चालकाने अर्जंट ब्रेक लावल्याने अनर्थ टळला. नंतर रिक्षा चालकाने वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु आपणच दारूच्या नशेत असल्याचा मामला त्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर तो रिक्षा घेऊन पसार झाला. बसमधील आठ ते दहा प्रवाशांच्या माहितीनुसार बस चालकाची कोणतीही चूक नसताना समोरून चालकाची रिक्षा बसवर धडकली. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ड्यूटीवरील शवाशा कर्मचार्याने वाहतूक सुरळीत करून बसला बस स्टॅण्डकडे रवाना केली.
छतावरून पडल्याने बालक गंभीर
जळगाव । घराच्या छतावरून खाली पडून चेतन भगवान भिल (12) हा बालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी तांबापूर परिसरात घडली. हा प्रकार लक्षात आल्यावर कुटुंबियांनी जखमी बालकास उपचारार्थ जिल्हा शासकिय रूग्णालयात हलविले. उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.