पुणे । जगातील मधुमेहींच्या तुलनेत भारतातील मधुमेहींची संख्या लक्षात घेता, मागील दशकात लोकसंख्या दीडपटीने वाढली, परंतु मधुमेहींच्या संख्येत दहापटीने वाढ झाली. दर 5 सेकंदाला एका दुर्देवी व्यक्तीचा मृत्यू मधुमेहामुळे होतो. दर 10 सेकंदाला एका नवीन मधुमेही रुग्णाची निदान होते. दर 6 अंध व्यक्तीमधील एक व्यक्ती मधुमेहामुळे अंध झालेला आहे. दर 30 सेकंदाला एका व्यक्तीला तिचा पाय मधुमेहामुळे गमवावा लागतो, अशी माहिती मधुमेह संशोधक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.रविंद्र नांदेडकर यांनी दिली.
‘अनुयश आरोग्य प्रतिष्ठान’ यांच्या वतीने मोफत रक्त शर्करा तपासणी महाशिबिराचे आयोजन नुकतेच बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी मधुमेह मुक्त भारत अभियान मशाल प्रज्ज्वलित करून झाले. ‘नेचर वेद इ डायबेटीस केअर कार्ड’चे लोकार्पण करून बालमधुमेहींना प्रतिष्ठानतर्फे काही बाल मधुमेही यांना दत्तक घेण्यात आले. या सोहळ्यास डॉ. कुमार सप्तर्षी, रामजी मिश्रा, संजय केणेकर सुरेश शेडगे, जगन्नाथ महाजन, ज्ञानेश्वर तपकिरे, अशोक मुरकुटे, रुपाली नांदेडकर, उषा पाटील, प्रशांत जाधव, दीपक पाटील, विलास नेवपुरकर आदी उपस्थित होते.डॉ. रविंद्र नांदेडकर म्हणाले की भारत देश हा मधुमेहाची जागतिक राजधानी ठरला आहे. जागितक आरोग्य संघटनेने देखील जगातील वाढत्या मधुमेहींची संख्या बघता वर्ष 2016 मधुमेहाला विशेष समर्पित केले होते. मागील वर्षी डायबेटीस मुक्तीचा नारा जगाला दिला आणि मधुमेह रुपी सामाजिक भस्मासुराचा एकजुटीने नायनाट करण्याचे आवाहन संपूर्ण जगाला केले.