मध्यप्रदेशात येणार कॉंग्रेसची सत्ता; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचे भाकीत

0

भोपाळ – परवा मध्य प्रदेश विधानसभेसाठी मतदान झाले. अत्यंत अटीतटीचा राजकीय सामना याठिकाणी रंगला आहे. निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य मतदरांनी विक्रमी मतदानासह मतपेठीत बंद केले आहे. आता मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्ता राखणार की काँग्रेस दीर्घकाळानंतर राज्यातील सत्तेत पुनरागमन करणार याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर यांनी राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असे सांगितल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भोपाळ येथून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस आमदार आरिफ अकील बाबूलाल गौर यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करण्याच्या ओघात बाबूलाल गौर यांना राज्यात काँग्रेसचा विजय होईल, तसेच तुम्ही मंत्री व्हाल, असे सांगून त्यांना शुभेच्छाही दिल्या.

यावेळी काँग्रेसने माझ्या सुनेला तिकीट मिळवून देण्यासाठी मदत केली, असेही बाबूलाल गौर म्हणाले, तसेच सरताज सिंह यांना तिकीट न दिल्याबद्दल त्यांनी भाजपाबाबत नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबूलाल गौर आणि आरिफ अकिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होते, असे आरिफ अकिल असे म्हणाले. तर बाबूलाल गौर यांना सांगितले की, जर माझ्या घरी कुणी आले तर त्या मी शाप तर देणार नाही ना? कुणी घरी आलं तर त्याला मिठाईच देईन, विष थोडेच देईन, हे आमचे प्रेम आहे. त्याला राजकारणाशी जोडी नका.