पुणे : राजस्थान आणि मध्य प्रदेशशी असलेले सांस्कृतिक संबंध आणि त्याचा राजकारणावर होणारा परिणाम यामुळे या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकालांकडे पुणेकरांचे लक्ष लागले असून त्याहीपेक्षा त्याबाबत पुण्यात जास्त उत्सुकता आहे.
राजस्थान आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांशी पुण्याचे व्यापारी, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध पूर्वापार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेर शहरांमध्ये अनेक मराठी कुटुंब असून पुण्यातील घराण्यांशी त्यांचे नातेसंबंध आहेत. पेशवाई काळात पुण्यातील अनेक कुटुंब मध्यप्रदेशात गेली आणि तिथेच स्थायिक झाली तरी त्यांचे पुण्याशी कायम संबंध राहिले आहेत. अलीकडे नोकरीच्या निमित्ताने जबलपूरला अनेक मराठी मंडळी पुण्यातून गेली आहेत. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पुण्याशी घनिष्ट संबंध असून पेशव्यांचे एक मोठे सरदार महादजी शिंदे यांची समाधी पुण्यातील वानवडी येथे शिंद्यांची छत्री म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्यात शिंदे यांची मालमत्ता आहे. काँग्रेसचे नेते कै.माधवराव शिंदे हे पुण्यात नियमित येत असत. ते महाराष्ट्राचे प्रभारी होते. मध्यप्रदेशातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यातर पुण्यातीलच. त्यांचा पूर्णाकृती पुतळा बालगंधर्व रंगमंदिरासमोर आहे. दरवर्षी तेथे त्यांचा स्मृतीदिन पाळला जातो आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला जातो.
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचे नातेवाईक पुण्याचे आहेत. पुण्याशी आपले ऋणानुबंध असल्याची भावना त्यांनी अलीकडे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही पुण्याशी संबंध आहेत. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग हे विठ्ठलभक्त असून ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पुण्यात येतात. पुण्यातील अनेक वारकरी संप्रदायातील प्रमुख लोकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने पुण्यातील भाविक मध्यप्रदेशात जात असतात. पुण्यातून गेलेल्या काही मंडळींची सदावर्ते, आश्रम नर्मदेकाठी आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी मध्यप्रदेशातील रावेर येथे आहे.
पुण्यातील जैन आणि मारवाडी समाज व्यापार, धार्मिक क्षेत्र आणि नातेसंबंधाने पुण्याशी जोडला गेला आहे. राजस्थानातील अनेक कुटुंब पुण्यात स्थायिक आहेत. राजस्थानी लोकांची मंडळं पुण्यात आहेत. राजस्थानी पदार्थ पुण्यात लोकप्रिय आहेत. राजस्थानी लोकांचे येथील महत्त्व लक्षात घेऊन वसुंधराराजे शिंदे यांची खास सभा २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात आयोजित केली होती. या सभेनंतर राजस्थानी समाज बहुसंख्येने भाजपकडे झुकला.अशा विविध कारणांमुळे या दोन्ही राज्यातील निवडणूक निकालाकडे पुणेकरांचे लक्ष आहे .
राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यात काँग्रेसची स्थिती सुधारली तर पुण्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम निश्चित होईल, आम्हा काँग्रेसजनांचा उत्साह वाढेल, अशी प्रतिक्रिया पुणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते रमेश अय्यर यांनी व्यक्त केली.