मुंबई । मध्य रेल्वेच्या कर्मचार्यांनी जबरदस्त कामगिरी करताना 8 तासांच्या ब्लॉकमध्ये तब्बल 9 गर्डर उभारण्याची किमया केली आहे. मध्य रेल्वेच्या परळ स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी आज 8 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकदरम्यान परळ स्थानकांत दुसर्या टप्प्यातील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या ब्लॉकदरम्यान एकूण 9 गर्डर उभारण्यात आले. यावेळी मध्य रेल्वेने 250 टन वजनी क्रेन, एक 200 टन वजनी क्रेन आणि 25 टन वजनी क्षमता असलेल्या 2 क्रेन्सचा वापर केला. शिवाय, या कामासाठी रेल्वेचे 125 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
परळ स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 मधील नवीन पुलावर 12 मीटर रुंदीच्या पुलासाठी 9 गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकच्या वेळेआधीच हे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. सकाळी 8.30 ते 4.30 असा हा ब्लॉक घेण्यात आला होता. पण, ब्लॉकच्या वेळेच्या आधीच हे काम पूर्ण झाले आहे. परळ स्थानकातील पादचारी पुलासाठी दुसर्यांदा गर्डर टाकण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक माटुंगा ते भायखळादरम्यान अप धिम्या मार्गावरून वळवण्यात आली होती, तर अप मार्गावरून मुंबईकडे येणार्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते भायखळादरम्यान अप धिम्या मार्गावरून चालवण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर स्थानकात थांबाच दिला गेला नव्हता.