मनपाचा भोंगळ कारभार

0

जागा ताब्यात घेण्यासाठी हयात नसलेल्या पण नाव साधर्म्य म्हणून मंगला पाटील यांना नोटीस


जळगाव:तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध सेवाभावी संस्थांना खुल्या जागा वितरीत केल्या होत्या. जिल्हा बँकेची जागा देखील जागृती महिला मंडळाला देण्यात आली होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी मनपा प्रशासनाने नोटीस काढली आहे. संस्थेच्या अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील या होत्या. आता हयात नसतांनाही केवळ नाव साधर्म्य असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना नोटीस बजाविली आहे. त्यामुळे निद्रीस्त असलेल्या महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

नगररचना विभागात 5 डिसेंबरला सुनावणी

तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1988 मध्ये ठराव करुन जागृती महिला मंडळाला दिली होती. परंतु संस्थेने करुन दिलेल्या करारानाम्यामधील अटी शर्तीचा भंग केल्या असल्याने तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार वितरीत करण्यात आलेली खुली जागा ताब्यात का घेवू नये, अशा आशयाची नोटीस मनपा प्रशासनाने एक महिन्यापूवी बजाविली होती. मात्र या नोटीसबाबत कुठलाही खुलासा न केल्याने महानगरपालिकेने पुन्हा नोटीस काढली आहे. संस्थेने ही जागा अनधिकृतपणे कोणताही हक्क नसतांना जिल्हा बँकेशी करार करुन भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. 5 डिसेंबर दुपारी 4 वाजता सुनावणीसाठी उपस्थित रहावे, अशा आशयाची नोटीस बजाविली आहे. मात्र जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील या हयात नाहीत. केवळ नाव साधर्म्य असल्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना ही नोटीस बजाविण्यात आली आहे.

तर पहिली नोटीस कुणाला बजाविली

रिंगरोडवरील जिल्हा बँकेची जागा ताब्यात घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी मनपाने नोटीस पाठविला असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये केला आहे. नोटीस पाठवूनही खुलासा सादर न केल्याने पुन्हा दुसर्‍यादा सुनावणीची नोटीस बजाविली आहे. मात्र पहिली नोटीस मनपा प्रशासनाने कुणाला बजाविली असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

माझी कोणतीही संस्था नाही. मी संस्थेची सदस्य सुध्दा नाही. तरी सुध्दा माझ्या घरच्या पत्त्यावर महानगरपालिकेने जिल्हा बँकेची जागा ताब्यात घेण्यासाठी आयोजित केलेल्या सुनावणीसाठी हजर रहावे, अशा आशयाची नोटीस घरी आली आहे. ही नोटीस बघितल्यानंतर मला देखील आश्‍चर्य वाटले. संस्था एकाची आणि नोटीस दुसर्‍याला असा अजब कारभार महापालिकेचा आहे. यासंदर्भात महानगरपालिकेला जाब विचारणार आहे. मंगला पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, जळगाव