जळगाव – नाविन बी.जे मार्केटच्या बाहेर अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे मार्केटच्या आत ग्राहकांनी कशा पद्धतीने यावे आणि ग्राहकच आले नाही तर आम्ही व्यवसाय कसे करावे अशा समस्या मार्केटमधील व्यापारी रोहित सोनवणे व नरेंद्र सपकाळे यांनी जनशक्तीशी बोलताना मांडले.
नवीन बी.जे मार्केट बाहेर गॅरेज वाल्यानी रस्तेच अडवून ठेवले आहे. मार्केटमधील दुकानदारांकडून सामान घ्यायचा आणि रस्त्यातच गाड्यांची कामे करायची यामुळे रस्तेही अडतात आणि सामानाचे निघालेले प्लास्टिक गटारीत टाकून गटारीही चोकब होतात. यातून दुर्गंधी निर्माण होऊन आजारांना आमंत्रण दिले जात आहे. तर संध्या ७ नंतर याठिकाणी चिकनच्या गाड्या मोठ्या प्रमाणात जागा व्यापून घेतात. यामुळे मार्केट जणू रात्री दारूचे अड्डेच बनलेले असतात. कारण गाड्यांजवळ गर्दी होऊ नये म्हणून दुकानदार रात्री बंद झालेल्या मार्केटमध्ये ग्राहकांना बसून तेथेच खाण्याच्या वस्तू पोहोचवितात. याठिकाणी काही दिवसांपूर्वीच दोन मध्यधुंदांमध्ये भानगडी झाल्या त्यातील एकाने दुसऱ्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली,वेळ प्रसंगी धुंदीत असलेले हे लोक दुकानदारांनाही ऐकत नाही.रात्री या रोडवर महिला देखील सुरक्षित नाही. मार्केटमध्ये मनपा तर्फे गेल्या ५/७ वर्षांपासून साफसफाई होत नाही,पाणी नाही या सर्व दृष्टिकोनातून नवीन बी.जे मार्केट समस्यानाचे महेर घरच बनले असल्याचेही त्यांनी सांगितले. मनपाचे कर्मचारी अतिक्रमण काढायला आले कि हि अतिक्रमणे नसतात आणि लगेच मनपाचे लोक गेले कि अतिक्रमण उभे राहतात. हे प्रकार मनपाचे कर्मचारी हप्ते घेतल्यानेच वाढत असल्याचे आरोप करत गेल्या दोन वर्षांपासून या समस्यांसंदर्भात मनपा कडे तक्रार करतोय, महापौर,आयुक्तांना निवेदने दिली तरीही काहीच होत नाही. अशा समस्या बुधवारी मार्केटमधील व्यापारी रोहित सोनवणे व नरेंद्र सपकाळे यांनी महापौर जयश्री महाजन यांची मनपा मध्ये भेट घेऊन मांडल्या.